गोरेगाव ड्रग्जप्रकरणी महेश खेमलानीच्या पोलीस कोठडीत वाढ

ड्र्रग्ज पुरविणारा युरोपमधील मित्र पोलिसांच्या रडारवर

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रातील ड्रग्जप्रकरणातील मुख्य आरोपी महेश हिरो खेमलानी ऊर्फ मार्क याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने बुधवारी दुपारी त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत रविवार 10 मेपर्यंत वाढ केली आहे. महेशच्या चौकशीत त्याचा युरोपच्या एका मित्राचा खुलासा झाला असून त्यानेच त्याला आतापर्यंत चार हजार इक्स्टशी गोळ्या विदेशातून पाठविल्याचे तपासात उघडकीस आले आहे. त्यामुळे ड्रग्ज पुरविणारा युरोपमधील हा मित्र पोलिसांच्या रडारवर आहे. त्याच्याविरुद्ध लवकरच पोलिसांकडून रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात येणार आहे.

11 एप्रिलला गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात एका म्युझिक कॉर्न्स्टमध्ये ड्रग्जचा अतिसेवन केल्यामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी भारतीय न्याय सहिता, दारुबंदी अधिनियम आणि एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच आतापर्यंत पोलिसांनी वेगवेगळ्या परिसरातून बारा आरोपींना अटक केली होती. त्यात महेश खेमलानी या मुख्य आरोपीचा समावेश आहे. पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला बुधवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याच्या पोलीस कोठडीत रविवारी 10 मेपर्यंत वाढ केली आहे.

महेशच्या चौकशीतून पोलिसांना अनेक धक्कादायक गोष्टींचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे. तपासात महेशचा युरोपमध्ये एक मित्र राहत असून तो त्याच्याकडून ड्र्रग्ज मागवत होता. त्यामुळे या गुन्ह्यांत आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी करणार्‍या टोळीचा सहभाग उघडकीस आला आहे. महेशच्या मित्राने त्याला दोन वेळेस तीन आणि एक हजार इक्स्टशी ड्रग्ज गोळ्या पाठविले होते. या गोळ्यांचे पार्सल आयुष साहित्यच्या उल्हासनगर येथील घरी पाठविण्यात आले होते. या गोळ्यांचा पैशांचा व्यवहार युएसडीटी या डिजीटल वॉलेटच्या माध्यमातून झाला होता. भारतीय चलन विदेशात रुपांतर करण्यासाठी महेशसाठी एका एजंटने महत्त्वाची भूमिका पार पाडल होती.

ही रक्कम महेश हा त्याच्या युरोपमधील मित्राला पाठवत होता. महेश, आयुष आणि या मित्राची मुंबईतील एका हॉटेलमध्ये भेट झाली होती. या भेटीत युरोपमधून इक्स्टशी गोळ्या पाठविण्याचा संपूर्ण व्यवहार झाला होता. त्याने चार हजार गोळ्या पाठविल्यानंतर त्यापैकी 935 गोळ्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. उर्वरित गोळ्या त्यांनी कुठे ठेवल्या आहेत याचा तपास सुरु आहे. महेश, आयुष आणि विनीत यांची भेट गोव्यात झाली होती. त्यानंतर ते मुंबईसह गोवा आणि इतर शहरात ड्रग्ज गोळ्या वितरीत करत असल्याचे उघडकीस आले आहे.

महेश या संपूर्ण कटाचा मास्तरमाईंड असून तो त्याच्या सहकार्‍यांच्या मदतीने इक्स्टशी गोळ्यांची तस्करी करत होता. त्यासाठी दोन तरुणांना कामावर ठेवले होते, त्यांना झटपट श्रीमंत होण्याचे स्वप्न दाखविण्यात आले होते. तो त्याच्या विदेशी मित्रांसह इतर काही आंतररराष्ट्रीय ड्रग्ज तस्काराच्या संपर्कात असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page