बारा रुपयांच्या पेमेंटसाठी वयोवृद्धाने गमावले 19.74 लाख
गॅस पेंमेटसह अपडेटच्या नावाने लिंक पाठवून घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
6 एप्रिल 2026
मुंबई, – महानगर गॅस लिमिटेडचे बिल भरणे तसेच अपडेटच्या नावाने अज्ञात सायबर ठगाने पाठविलेल्या लिंकवरुन पेमेंट करणे एका वयोवृद्धाला चांगलेच महागात पडले. बारा रुपयांच्या पेमेंटसाठी अज्ञात सायबर ठगांनी त्यांचा मोबाईलसह बँक अॅप हॅक करुन 19 लाख 74 हजाराची ऑनलाईन फसवणुक केल्याचा प्रकार घाटकोपर परिसरात उघडकीस आले आहे. याप्रकरणी पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेलने अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
मुकेश रमणिकलाल शहा हे 72 वर्षांचे तक्रारदार घाटकोपर परिसरात राहत असून ते एका खाजगी कंपनीतून निवृत्त झाले आहे. 1 मे 2026 रोजी त्यांच्या मोबाईलवर एक मॅसेज आला होता. त्यात त्यांचे एमजीएलचे बिल अपडेट नाही, त्यामुळे रात्री दहा वाजता त्यांचे गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे नमूद करण्यात आला होता. या मॅसेजमध्ये श्रीकांत मिश्रा या व्यक्तीच्या नावासह त्याचा मोबाईल क्रमांक दिला होता. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता. यावेळी समोरील व्यक्तीने त्यांचे महानगर गॅस बिल बाकी आहे, त्यांचे बिल अपडेट झाले नाही.
बिलाची बारा रुपयांची रक्कम शिल्लक असल्याचे सांगून ती रक्कम तातडीने भरण्यास सांगितले. त्यासाठी त्याने त्यांना एक लिंक पाठविली होती. ही लिंक ओपन करुन त्यांनी बारा रुपयांचे पेमेंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचे पेमेंट झाले नाही. काही वेळानंतर त्यांचे मोबाईलसह बँक अॅप हॅक झाले होते. याच दरम्यान त्यांच्यासह त्यांच्या पत्नी, भाऊ, त्याची पत्नी अशा चौघांच्या बँक खात्यातून काही ऑनलाईन व्यवहार झाले होते. त्यातून त्यांच्या चारही बँक खात्यातून 19 लाख 74 हजार 226 रुपये डेबीट झाले होते. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या भावाने सायबर हेल्पलाईन क्रमांकासह पूर्व प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल विभागात तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा पूर्व सायबर सेल पोलिसांकडून तपास सुरु केला आहे. ज्या बँक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्या बँक खात्यासह खातेदाराची माहिती काढण्याचे काम सुरु आहे. बारा रुपयांच्या पेमेंटसाठी पाठविलेली लिंक ओपन करणे तक्रारदार वयोवृद्धाला चांगलेच महागात पडले आहे. बारा रुपयांच्या पेमेंटपायी त्यांच्या चारही बँक खात्यातून अज्ञात सायबर ठगांनी 19 लाख 74 हजारांची ऑनलाईन फसवणुक केली होती. या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.