पगार दिला म्हणून किचनमधील साडेसोळा लाखांच्या साहित्यांची चोरी
कॅटरींग कंपनीच्या मॅनेजरसह मेन कुक व हेल्परविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
8 एप्रिल 2026
मुंबई, – गॅसच्या कमतरतेमुळे कॅटरिंग व्यवसायात नुकसान झाल्याने मालकाने कर्मचार्यांना पगार दिला म्हणून रागाच्या भरात कंपनीच्या तीन कर्मचार्यांनी किचनमधील साडेसोळा लाखांच्या साहित्यांची चोरी करुन त्याची बाहेर विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार साकिनाका परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिन्ही कर्मचार्याविरुद्ध साकिनाका पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यात कॅटरिंग कंपनीचा मॅनेजर हरिंदर रावत, मेन कुक साकिम आलम आणि हेल्पर रणजीत रजक यांचा समावेश आहे. या तिघांनाही पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पद्मनाभ चमनलाल मुसरानी हे 36 वर्षांचे तक्रारदार हिमाचलप्रदेशच्या मंडी, मुसरानी गावचे रहिवाशी आहे. गेल्या दहा महिन्यांपासून ते अंधेरीतील चिमणपाडा परिसरात राहतात. त्यांचा ओयासिस हॉस्पिटीलिटी नावाची एक कॅटरिंग कंपनी आहे. या कंपनीचे एक युनिट साकिनाका येथील टेक सेंटर, नारायण प्लाझामध्ये आहे. या युनिटमधून काही कार्पोरेट कंपन्यांना जेवण पुरविण्याचे काम केले जाते. त्यासाठी लागणारे सर्व साहित्य किचन टेबल, फ्रिज, डब्बे, टेबल आदी साहित्य युनिटमध्ये ठेवण्यात आले होते. त्यांच्याकडे हरिंदर रावत हा मॅनेजर, साकिम आलम मेन कुक आणि रणजीत रजक हा हेल्पर म्हणून काम करत होते.
दिवसा काम करुन ते तिघेही तिथे राहत होते. मार्च 2026 रोजी भारतात गॅसची कमतरता असल्याने त्यांच्या ओयासिस हॉस्पिलिटीचे मेन ग्राहक त्यांच्यापासून कमी झाले झाले होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्या विक्रोळीतील कॅफेकडे अधिक लक्ष केंद्रीत केले होते. आठवड्यातून दोन वेळा ते साकिनाका येथील युनिटला भेट देत होते. काम कमी झाल्याने त्यांना युनिटमधील कर्मचार्यांना पगार देता आले नाही. तरीही त्यांनी पैशांची जुळवाजुळव करुन कर्मचार्यांना पगाराची अर्धी रक्कम दिली होती. त्यामुळे युनिटमधील कर्मचार्यांमध्ये प्रचंड नाराजी होती. 1 मेला त्यांना एका माजी कर्मचार्याने कॉल करुन त्यांच्या साकिनाका युनिटमधील काही कर्मचारी किचनमधील साहित्यांची चोरी करुन बाहेर विक्री करत असल्याचे सांगितले.
या माहितीनंतर ते त्यांच्या युनिटमध्ये गेले होते. त्यांनी तेथील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी त्यांना किचनमधील सुमारे साडेसोळा लाखांचे सर्व साहित्य चोरीस गेल्याचे दिसून आले. चौकशीअंती 29 एप्रिल ते 3 मे 2026 या कालावधीत हरिंदर रावत, साकिम आलम आणि रणजीत रजक यांनी संगनमत करुन ही चोरी करुन किचनमधील साहित्यांची विक्री केल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांच्या युनिटमधील मॅनेजरसह मेन कुक आणि हेल्पर अशा तिघांविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर हरिंदर रावत, साकिम आलम आणि रणजीत रजक यांच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. मालकाने पगार दिला नाही म्हणून रागाच्या भरात त्यांनी किचनमधील साडेसोळा लाखांच्या साहित्यांची चोरी केल्याचे तपाासत उघडकीस आले आहे. ते तिघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.