सफाई कामगार म्हणून नेमणुकीच्या आदेशासाठी लाचेची मागणी
मनपाच्या सहाय्यक मुख्य पर्यवेक्षकासह कामगाराला लाचप्रकरणी अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – सफाई कामगार म्हणून नेमणुकीच्या आदेशासाठी पंधरा हजाराची लाचेची मागणी करुन दहा हजार रुपयांचा पहिला हप्ता घेताना महानगरपालिकेच्या दोन कर्मचार्यांना मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी अटक केली. त्यात प्रभारी सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक योगेश रमाकांत सावंत आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचा कामगार सुशांत चंद्रकांत गमरे यांचा समावेश असून ते दोघेही महानगरपालिकेच्या के साऊथ वॉर्डमधील कर्मचारी आहे. अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
यातील तक्रारदार अंधेरीतील सहार स्लम चौकीत सफाई कामगार म्हणून काम करतात. त्यांनी कायमस्वरुपी सफाई कामगार म्हणून नेमणूक करण्याबाबत एक अर्ज केला होता. हा अर्ज प्रभारी सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक योगेश सावंत यांच्याकडे होता. त्यांच्या नेमणूकीबाबतचे कायमस्वरुपी आदेश काढण्यासाठी त्यांच्याकडे त्यांनी पंधरा हजाराची लाचेची मागणी केली होती. ही लाच दिल्याशिवाय त्यांचा आदेश काढणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. त्यामुळे त्यांनी लाचेची रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांच्याविरुद्ध मुंबई युनिटच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती. या तक्रारीची मंगळवारी 5 मेला संबंधित अधिकार्यांकडून शहानिशा करण्यात आली होती.
यावेळी योगेश सावंत यांनी त्यांच्या कामासाठी पंधरा हजाराच्या लाचेची मागणी करुन ती स्विकारण्याची तयारी दर्शविली होती. ठरल्याप्रमाणे तक्रारदार पंधरा हजाराची रक्कम घेऊन त्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्याने त्यांनी लाचेचा पहिला दहा हजाराचा हप्ता कामगार सुशांत गमरे यांच्याकडे देण्यास सांगितले होते. त्यामुळे त्यांनी ती रक्कम सुशांत गमरे यांना दिली होती. यावेळी तिथे सापळा लावलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना दहा हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही रक्कम त्याने सुशांत सावंत यांच्या वतीने घेतली होती. त्यामुळे या गुन्ह्यांत नंतर त्यांच्यावरही या अधिकार्यांनी कारवाई केली होती. या दोघांविरुद्ध भष्ट्राचार प्रतिबंधक अधिनियम 1988 चे कलम 7, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटकेनंतर या दोघांनाही विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना कोर्टाने 8 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल हारुगडे, पोलीस निरीक्षक चित्तरवाड यांनी केल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अजीत सुळे यांनी सांगितले. महानगरपालिकेच्या दोन अधिकार्यांना एकाच वेळेस लाचेच्या गुन्ह्यांत अटक झाल्याचे समजताच के साऊथ वॉर्डमधील अधिकारी आणि कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली होती.