वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलासह दोघांवर प्राणघातक हल्ला

दोन्ही गुन्ह्यांतील अल्पवयीन मुलांची डोंगरी बालसुधारगृहात रवानगी

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – गोवंडी आणि चुन्नाभट्टीतील दोन वेगवेगळ्या घटनेत एका अल्पवयीन मुलासह दोघांवर चार अल्पवयीन मुलांनी तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी शिवाजीनगर आणि चुन्नाभट्टी पोलिसांनी दोन स्वतंत्र हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन चारही अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. ते चौघेही सोळा ते सतरा वयोगटातील असून त्यांना पुढील कारवाईसाठी डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.

पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार शमीन ऐनुल अन्सारी हे गारमेंट व्यावसाकि असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत गोवंडीतील बैंगनवाडीत राहतात. त्यांना अजमल आणि रेहमत नावाचे दोन मुले आहेत. मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांचा मुलगा रेहमत हा गावचा नातेवाईक इस्तकारसोबत जात होता. यावेळी त्याला आरोपी अफान दिसला, मात्र त्याने त्याला पाहून न पाहिल्यासारखे केले होते. त्यानंतर तो तसाच निघून गेला होता. त्याचा अफानला प्रचंड राग आला होता. त्यामुळे तो त्यांच्या मागे गेला. त्याने त्याला शिवीगाळ करुन माझ्याशी बोलण्यास कोणी तुला मनाई केली आहे का याबाबत विचारणा केली.

यावेळी त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यात अजमलने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याने त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात अजमल हा गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने जवळच्या सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी शमीन अन्सारीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अफानविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला ताब्यात घेतल्यानंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते.

दुसरी घटना रविवारी दुपारी सव्वाच्या सुमारास चुन्नाभट्टी येथे घडली. दैविक हा सोळा वर्षांचा मुलगा परळ येथे राहत असून तो सध्या शिक्षण घेतो. त्याचा क्लासमध्ये अथर्व आहे. काही दिवसांपूर्वी अथर्व हा क्लासमध्ये गैरहजर होता. ही माहिती त्याने शिक्षकांना स्वतहून दिली होती. याच कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्याच्या रागातून दैविकवर तीन अल्पवयीन मुलांनी तिक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात त्याच्या कपाळावर गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला सायन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

याप्रकरणी चुन्नाभट्टी पोलिसांत हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल होताच तिन्ही आरोपी मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ते तिघेही सतरा वयोगटातील असून त्यांना नंतर डोंगरीतील बालसुधारगृहात पाठविण्यात आले होते. गैरहजर राहणार्‍या विद्यार्थ्यांची माहिती शिक्षकांना दिल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे पोलिसाकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page