सव्वाअकरा कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन फसवणुक
हिरे व्यापार्याच्या तक्रारीवरुन दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
7 एप्रिल 2026
मुंबई, – क्रेडिटवर विक्रीसाठी घेतलेल्या सव्वाअकरा कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन एका हिरे व्यापार्याची त्यांच्याच परिचित दोन हिरे व्यापार्यांनी फसवणुक केल्याचा प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन्ही हिरे व्यापार्याविरुद्ध बीकेसी पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आनंद ठाकूर आणि अर्जुन पांडे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही मूळचे हैद्राबादच्या तेलंगणाचे रहिवाशी आहेत. त्यांच्या अटकेसाठी एक टिम लवकरच तेलंगणाला जाणा असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हा गुन्हा 1 सप्टेंबर 2025 ते 21 जानेवारी 2026 या कालावधीत वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स, जे. डब्ल्यू टॉवर, ऑफिस क्रमांक 8010 मध्ये घडला होता. केतन सुबोध चौक्सी हे हिरे व्यापारी असून ते नेपियन्सी रोड परिसरात त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांचा वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्समध्ये हिरे खरेदी-विक्री करणारी एक खाजगी कंपनी आहे. याच कंपनीतून त्यांच्या हिर्यांचा व्यवहार चालतो. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यांत त्यांची आनंद ठाकूर आणि अर्जुन पांडेशी ओळख झाली होती. ते दोघेही हिरे खरेदी-विक्रीशी संबधित व्यापारी होते. त्यांनी त्यांच्यासोबत व्यवहार करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
सुरुवातीला कमी प्रमाणात क्रेडिटवर हिरे घेऊन त्यांनी दिलेल्या मुदतीत हिर्यांचे पेमेंट करुन त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडून आणखीन काही हिर्यांची मागणी केली होती. विक्रीसह शोरुममध्ये हिर्यांची गरज असल्याचे सांगून त्यांनी त्यांच्याकडून सव्वाअकरा कोटी रुपयांचे 3370 हिरे घेतले होते. त्यापैकी पावणेसात कोटीचे हिरे आनंद ठाकूर तर साडेचार कोटीचे हिरे अर्जुन पांडेने घेतले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी हिर्यांचे पेमेंट केले नाही किंवा विक्रीसाठी घेतलेले हिरे परत केले नव्हते. वारंवार विचारणा करुनही त्यांच्याकडून त्यांना काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.
काही दिवसांनी त्यांनी त्यांचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला होता. विक्रीसाठी घेतलेल्या सुमारे सव्वाअकरा कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन या दोघांनी केतन चौक्सी यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी त्यांच्याविरुद्ध बीकेसी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर आनंद ठाकूर आणि अर्जुन पांडे यांच्याविरुद्ध पोलिसांनी हिर्यांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ते दोघेही तेलंगणाचे रहिवाशी असल्याने त्यांच्या अटकेसाठी एक टिम लवकरच तिथे जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.