मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मुंबई, – मालाडमध्ये सुरु असलेल्या एका इमारतीच्या प्रोजेक्टमध्ये स्वस्तात फ्लॅटच्या आमिषाने एका 37 वर्षीय अभिनेत्रीची सुमारे 89 लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी एका बिल्डरसह रियल इस्टेट एजंट अशा दोघांविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून फ्लॅटसाठी घेतलेल्या पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी बांगुरनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कमल सेवाराम जाधवानी आणि संजय रामचन विजला अशी या दोघांची नावे आहेत. चौदा वर्ष उलटूनही त्यांनी इमारतीचा प्रोजेक्ट पूर्ण सुरु केला, फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा फ्लॅटसाठी घेतलेले पैसे परत न करता फसवणुक केल्याचा आरोप आहे. याच गुन्ह्यांत या दोघांची लवकरच पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या चौकशीनंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आहे.
करिश्मा ऊर्फ सिमा दिलीप कर ही अभिनेत्री असून ती सध्या तिच्या कुटुंबियांसोबत मालाडच्या एव्हरशाईननगर परिसरात राहते. गेल्या वीस वर्षांपासून ती अभिनेत्री म्हणून काम करते. तिची श्वेता गुप्ता नावाची एक मैत्रिण असून तिचा पती संजय विजला हा रियल इस्टेट एजंट आहे. फेब्रुवारी 2012 रोजी तिची संजयशी ओळख झाली होती. या भेटीत त्याने तिला मालाडच्या लिंक रोड, एव्हरशाईन, वळनाई परिसरात राज इन्फिनिया कंपनीचा एक मोठा प्रोजेक्ट सुरु होणार असून या प्रोजेक्टच्या सी विंगच्या चौदाव्या मजल्यावर थ्री बीएचके फ्लॅटचे आमिष दाखविले होते. याच दरम्यान त्याने तिची अंधेरीतील क्रिस्टल प्लाझामध्ये असलेल्या कमल जाधवानी या बिल्डरशी ओळख करुन दिली होती. त्याने श्वेताची मैत्रिण असल्याने तिला स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
इमारतीचे बांधकाम चार वर्षांत पूर्ण होईल, या प्रोजेक्टमध्ये गुंतवणुक केल्यास तिला नक्कीच चांगला फायदा होईल असे सांगून तिला फ्लॅटमध्ये गुंतवणुक करण्यास सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून तिने एक फ्लॅट घेण्याचा निर्णय घेतला होता. ठरल्याप्रमाणे तिने त्यांना 20 लाख धनादेश तर 69 लाख रुपये कॅश असे 89 लाख रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांनी तिला ए.एस.के कॉर्पोरेशन बिल्डर अॅण्ड डेव्हल्पर कंपनीचे फ्लॅटचे अलोटमेंट लेटर आणि कराराचे कागदपत्रे देण्यात आले होते. या करारात तिला चार वर्षांत फ्लॅटचा ताबा देण्याचे ठरले होते. मात्र दोन वर्ष उलटूनही त्यांनी त्यांचे प्रोजेक्टचे काम सुरु केले नाही. याबाबत तिने संजयकडे विचारणा केली असता त्याने तिला दिलेल्या मुदतीत तिला फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगितले.
मात्र चार वर्ष उलटूनही त्यांनी इमारतीचे बांधकाम सुरु केले नव्हते. त्यामुळे तिने फ्लॅटसाठी दिलेल्या 89 लाखांची मागणी सुरु केली होती. यावेळी संजयने सहा महिन्यांत काम सुरु होणार असून तिला लवकरच फ्लॅटचा ताबा मिळेल असे सांगून तिच्याकडे काही दिवसांची मुदत मागितली होती. मात्र त्यांच्यावर विश्वास नसल्याने तिने त्यांच्याकडे पैशांसाठी तगादा लावला होता. वारंवार मिटींग घेऊन त्यांनी पैसे दिले नाही. काही दिवसांनी संजयसह त्याची पत्नी श्वेताने तिला पैसे मिळणार नाही. पैशांसाठी त्यांना कॉल करु नकोस असे सांगून शिवीगाळ केली होती. आजच्या घडीला या फ्लॅटची किंमत तीन ते साडेतीन कोटी होती, त्यामुळे तिने कमल जाधवानीची भेट घेऊन त्याच्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न केला. यावेही त्याने तिला दिड कोटी रुपये मान्य केले.
याबाबत त्यांचा एक लेखी करार झाला होता. या करारानंतर त्याने तिला काही धनादेश दिले, मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. याबाबत विचारणा केल्यानंतर त्याने तिलाच शिवीगाळ केली होती. चौदा वर्ष उलटूनही कमल जाधवानी आणि संजय विजला यांनी फ्लॅटसाठी पैसे घेऊन तिला फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा सेंटलमेंटप्रमाणे दिड कोटी रुपये परत केले नाही. तिला बोगस अलोटमेंट आणि कराराचे कागदपत्रे देऊन तिची फसवणुक केली होती. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तिने या दोघांविरुद्ध बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर कमल जाधवानी आणि संजय विजला या दोघांविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.