मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या घटनेत बंद फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात व्यक्तीने सुमारे तीस लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केल्याची घटना गोरेगाव आणि ताडदेव परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी बांगुरनगर आणि ताडदेव पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद करुन तपास सुरु केला आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून या फुटेजवरुन पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
पहिली घटना सोमवारी सायंकाळी पावणेसात ते रात्री आठच्या सुमारास गोरेगाव येथील न्यू लिंक रोड, शहिद भगतसिंग नगर, गोरेगाव बस डेपोजवळील लोकसेवा चाळीत घडली. याच चाळीत 53 वर्षांचे मारुती कैराप्पा कांबळे हे त्यांच्या पत्नी आणि मुलासोबत राहतात. ते बेस्टमध्ये चालक म्हणून काम करत असून सध्या त्यांची नेमणूक गोरेगाव बस डेपोमध्ये आहे. सोमवारी सकाळी साडेदहा वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर निघून गेले होते. रात्री आठ वाजता ड्यूटी संपल्यानंतर ते घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांना त्यांची पत्नी रंजना कांबळे हिचा कॉल आला होता. तिने त्यांच्या घरी चोरी झाली असून अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करुन सुमारे वीस लाखांचे विविध सोन्याचे दागिने चोरी केल्याचे सांगितले.
त्यांची पत्नी सायंकाळी योगा क्लासला गेली होती. यावेळी घरात कोणीही नव्हते. सव्वातासाच्या अंतराने त्यांच्या घरात प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने रुमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर कपाटातील विविध सोन्याचे दागिने व तीस हजाराची कॅश सुमारे वीस लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी मारुती कांबळे यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.
दुसर्या घटनेत ताडदेव येथील एका महिलेच्या बंद फ्लॅटचा कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे साडेदहा लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले. ही घटना 7 मे सायंकाळी साडेचार ते 8 मे रात्री आठच्या कालावधीत ताडदेवच्या तुळशीवाडी, आंबेडकरनगर, सम्राट अशोक सोसायटीमध्ये घडली. याच सोसायटीच्या रुम क्रमांक 1705 मध्ये 55 वर्षांची तक्रारदार महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहते. तिचे पती महानगरपालिकेतून निवृत्त झाले आहेत. 4 मेला तिचे पती त्यांच्या रत्नागिरीतील लांझा, कनगवली गावी घराच्या दुरुस्तीसाठी तर ती तिच्या आग्रीपाडा येथील भावाच्या घरी दोन दिवस राहण्यासाठी गेली होती. यावेळी तिच्या घरात कोणीही नव्हते. शुक्रवारी 8 मेला ती तिच्या घरी आली होती.
यावेळी तिला तिच्या फ्लॅटचे कुलूप तुटलेले दिसले. तिने आतमध्ये जाऊन पाहणी केली असता आतील सर्व अस्ताव्यस्त पडले होते. लोखंडी ड्राव्हरची पाहणी केल्यानंतर तिला ड्राव्हरमधील सर्व सोन्याचे दागिने आणि कॅश चोरीस गेल्याचे दिसून आले. या ड्राव्हरमध्ये विविध सोन्याचे दागिने आणि वीस हजाराची कॅश असा दहा लाख साठ हजार रुपयांचा मुद्देमाल होता. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करुन हा संपूर्ण मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. याप्रकरणी ताडदेव आणि बांगुरनगर पोलिसांनी घरफोडीचे गुन्हे दाखल करुन आरोपींचा शोध सुरु केला आहे.