42 लाखांच्या भिशीसह दागिन्यांचा अपहार करुन फसवणुक
अडीच महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या व्यावसायिकाला अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मुंबई, – भिशीमध्ये गुंतवणुकीसाठी दिलेल्या 25 लाखांसह साडेसतरा लाखांचे सोन्याचे दागिने असा 42 लाखांचा मुद्देमालाचा अपहार करुन एका कापड व्यापार्याची फसवणुक केल्याप्रकरणी अजय शंकर धस नावाच्या एका 45 वर्षांच्या आरोपी व्यावसायिकाला चारकोप पोलिसांनी अटक केली. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. अजयचा भिशीचा व्यवसाय असून त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
शंकर शेखर शेट्टी हे कापड व्यापारी असून ते कांदिवलीतील चारकोप परिसरात राहतात. चार वर्षांपूर्वी त्यांनी मालाडच्या मालवणी, गणेशनगर परिसरात रेडीमेंट गारमेंटचा व्यवसाय सुरु केला होता. यावेळी त्यांची अजय धसशी ओळख झाली होती. तो बोरिवलीतील गोराई येथे राहत असून त्याचा भिशीचा व्यवसाय होता. त्यांना व्यवसाय वाढीसाठी पैशांची गरज होती. त्यामुळे त्यांनी अजयसोबत भिशीच्या व्यवसायात पार्टनरशीप सुरु केली होती. याच दरम्यान त्यांनी स्वतचा भिशीचा व्यवसाय सुरु केला होता. अजय हा अनेकांना व्याजाने पैसे देत होता. त्यामुळे ते अजयला चार टक्क्यांनी तर तो इतरांना दहा टक्क्यांनी पैसे देत होता. त्यातून त्यांचा व्यवसाय सुरळीत सुरु होता. या व्यवहामुळे त्यांच्यात चांगले मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. अजय हा त्याच्या भिशीचे पैसे त्यांना त्यांच्या व्यवसायासाठी वापरण्यासाठी देत होता. त्याला अंगावर सोन्याचे दागिने घालण्याची सवय होती.
अनेकदा तो कोणत्याही कार्यक्रमांत लाखो रुपयांचे दागिने घालून जात होता. त्यामुळे त्याच्यावर अनेकांची चांगली छाप पडत होती. त्यामुळे त्यांनी त्याला अनेकदा त्यांच्या घरातील दागिने दिले होते. ते दागिने घालून तो त्याच्या गावी जात होता. ऑक्टोंबर 2025 रोजी त्याला नातेवाईकाच्या गावी लग्न आणि साखरपुड्यासाठी जायचे होते, त्यासाठी त्याला काही दागिन्यांची गरज होती. त्यामुळे त्याने त्यांच्याकडे काही दागिन्यांची मागणी केली होती. त्याच्या भिशीचे पैसे जानेवारी महिन्यांत येणार होते, त्याला कोणीही दागिने देत नसल्याने त्यांनी त्याला तीन अंगठ्या, एक ब्रेसलेट, पाच चैन असा साडेसतरा लाख रुपयांचे दागिने दिले होते. लग्नानंतर त्याच्या मुलाचा वाढदिवस होता. त्यामुळे ते दागिने एका आठवड्यात परत करतो असे त्याने त्यांना सांगितले होते.
मात्र पंधरा दिवस उलटूनही त्याने त्यांना दागिने दलिे नाही. फोन केल्यानंतर त्याचा फोन बंद असल्याचे दिसून आले. त्यांनी अजयकडे भिशीचे 25 लाख रुपयांची गुंतवणुक केली होती. दिलेल्या मुदतीत त्याने भिशीचे 25 लाख आणि साडेसतरा लाखांचे सोन्याचे दागिने असा 42 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल परत केला नाही. वारंवार विचारणा करुनही तो त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून फसवणुक होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी अजय धसविरुद्ध चारकोप पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.
गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असतानाच या गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या अजयला अडीच महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. अजयने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.