भाड्याने दिलेला फ्लॅट हेव्ही डिपॉझिटवर देऊन वयोवृद्धेची फसवणुक
तीस लाख हेव्ही डिपॉझिट घेणार्या महिला भाडेकरुविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
12 मे 2026
मुंबई, – दिड लाख रुपये डिपॉझिट आणि प्रतिमाह सत्तर हजाराच्या भाड्याने दिलेल्या फ्लॅट परस्पर हेव्ही डिपॉझिटवर देऊन एका 73 वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची तिच्याच भाडेकरु महिलेने फसवणुक केल्याचा धक्कादायक प्रकार वांद्रे परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी रुबीना मेहबूब शेख या आरोपी महिलेविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. रुबीनाने बोगस पॉवर ऑफ अॅटनी बनवून तो फ्लॅट तिच्या मालकीचा भासवून दुसर्या महिलेला पाच वर्षांसाठी तीस लाखांचा हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट दिल्याचा आरोप आहे.
73 वर्षांची नलिनी रिटा फर्नाडिस ही महिला मिरारोड परिसरात राहते. तिच्या मालकीचा वांद्रे येथील शेरली राजन रोडवरील ग्रीनफिल्ड सोसायटीमध्ये एक फ्लॅट आहे. मे 2025 पर्यंत ती याच फ्लॅटमध्ये राहत होती. तिचा मुलगा बंगलोर येथे नोकरी करत असल्याने तसेच तिला हृदयविकाराचा झटका आल्याने ती तिच्या मिरारोड येथील विवाहीत मुलीच्या घरी राहण्यासाठी गेली होती. त्यामुळे तिने वांद्रे येथील फ्लॅट भाड्याने देण्याचा निर्णय घेतला होता. स्थानिक इस्टेट एजंटच्या मदतीने तिची रुबीनाशी ओळख झाली होती. रुबीना भाड्याने एका फ्लॅटची गरज होती. त्यामुळे तिने तिचा फ्लॅटमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता.
याबाबत बोलणी झाल्यानंतर त्यांच्यात 1 जून 2026 ते 31 मे 2027 या दोन वर्षांसाठी दिड लाख रुपये डिपॉझिट आणि सत्तर हजार रुपये प्रति महिना भाड्यावर रजिस्ट्रर लिव्ह अॅण्ड लायसन्स अग्रीमेंट झाले होते. ठरल्याप्रमाणे 21 मेला तिने रुबीना फ्लॅटचा ताबा दिला होता. मात्र ती भाडे वेळेवर देत नव्हती. त्यामुळे तिने तिला 15 नोव्हेंबर 2025 रोजी एक नोटीस पाठवून एका महिन्यांत फ्लॅट खाली करण्यास सांगितले होते. यावेळी रुबीनाने तिला शिल्लक तसेच पुढील तीन महिन्यांचे भाडे दिले होते. त्यामुळे तिने तिला राहण्यास दिले होते.
8 फेब्रुवारी 2026 रोजी नलिनी ही तिच्या दोन मुली अमेंडा आणि रोजीलिनासोबत वांद्रे येथील फ्लॅटमध्ये आली होती. यावेळी तिला तिच्या फ्लॅटमध्ये रुबीना राहत नसल्याचे दिसून आले. तिथे सुमैया शेख नावाची एक महिला तिच्या कुटुंबियांसोबत राहत होती. त्यामुळे त्यांनी सुमैयाकडे विचारणा केली होती. यावेळी तिने रुबीनाने तो फ्लॅट सायका नाजीर अहमद शेख यांना तीस लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर पाच वर्षांसाठी दिल्याचे समजले. सायका ही सुमैयाची बहिण होती. ही माहिती ऐकल्यानंतर त्यांना धक्काच बसला होता. त्यामुळे त्यांनी तिच्याकडे भाडेकरार आणि पॉवर ऑफ अॅटनी कागदपत्रांची मागणी केली हेती.
यावेळी त्यांना रुबीनाने नलिनी व तिचा मुलगा ट्रेव्हर यांच्या नावाने बोगस पॉवर ऑफ अॅटनी करुन तो फ्लॅट तिच्या मालकीचा असल्याचा दाखविण्याचा प्रयत्न केला होता. तिला दिलेला भाड्याचा फ्लॅट तिने दुसर्या महिलेला पाच वर्षांसाठी तीस लाखांच्या हेव्ही डिपॉझिटवर दिला होता. रुबीना भाडेकरु म्हणून ठेवताना नलिनीने सोसायटीची रिसतर परवानगी घेतली होती, मात्र रुबीनाने हेव्ही डिपॉझिटवर फ्लॅट देताना तिच्यासह सोसायटीला कुठलीही माहिती दिली नाही. त्यांची कुठलीही परवानगी न घेताना केवळ फसवणुकीसाठी बोगस दस्तावेज बनवून तीस लाख रुपये घेतल्याचे उघडकीस आले होते.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच नलिनी फर्नाडिस हिने खार पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भाडेकरु रुबीना शेख हिच्याविरुद्ध बोगस दस्तावेज बनवून पैशांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.