मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 मे 2026
मुंबई, – कौटुंबिक वादानंतर विभक्त राहणार्या पत्नीचा पत्ता सांगत नाही म्हणून एका विकी नरेश जाधव या 27 वर्षांच्या तरुणावर त्याच्या भावोजीसह मित्राने शिवीगाळ करुन लाथ्याबुक्यांनी बेदम मारहाण करुन प्राणघातक हल्ला केला होता, या हल्ल्यानंतर पळून गेलेल्या आरोपी भावोजीला अखेर साकिनाका पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याचा सहकारी मित्र गुलाब शेख याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.
ही घटना 23 एप्रिलला रात्री पावणेनऊ ते साडेनऊच्या सुमारास साकिनाका येथील संघर्षनगर, इमारत क्रमांक सतरामध्ये घडली होती. विकी जाधव हा साकिनाका येथील जरीमरी परिसरात राहत असून कुर्ला येथील एका महिंद्रा होम फायनान्स कंपनीत ऑफिस बॉय म्हणून काम करतो. सोनाली तांबे ही त्याची मोठी मुलगी असून तिच्या पती नाव नरेश तांबे आहे. गेल्या सहा वर्षांपासून त्यांच्यात कौटुंबिक वाद सुरु होता. त्यातून सोनालीने तिच्या मुलासोबत नरेशपासून विभक्त राहण्याचा निर्णय घेतला होता. सध्या ते दोघेही विभक्त राहत असून तिने नरेशला स्वतचा पत्ता सांगितला नव्हता. 23 एप्रिलला विकी व त्याची पत्नी प्रतिक्षा हे दोघेही कामावर निघून गेले होते. घरात त्याची सासू लता ही एकटीच होती. यावेळी नरेश हा त्यांच्या घरी आला आणि त्याने सोनालीचा पत्ता सांगत नाही म्हणून विकीला जिवे मारण्याची धमकी दिली होती.
सायंकाळी ही माहिती सासूकडून समजताच विकी त्याला जाब विचारण्यासाठी गेला होता. यावेळी नरेशने त्याला त्याची मुलगी आणि मुलगा परत आणून दे, बहिणींशी पुन्हा बोलणे करुन दे, तसेच तिचा राहण्याचा किंवा कार्यालयातील पता सांगितला नाहीतर तुझा गेम करण्याची धमकी दिली होती. याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. यावेळी नरेशने त्याला शिवीगाळ करुन बेदम लाथ्याबुक्यांनी मारहाण केली होती. त्याच्यासोबत असलेल्या गुलाब शेख यानेही त्याचे हातपाय तोडण्याची धमकी दिली होती. भांडणात त्याच्या पत्नीने मध्यस्थी केली असता त्यांनी तिला शिवीगाळ केली होती.
यावेळी या दोघांनी त्याचे डोके भिंतीवर जोरात आपटल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. या मारहाणीनंतर ते दोघेही पळून गेले होते. हल्ल्यात जखमी झालेल्या विकीला नंतर त्याची पत्नीसह बहिणीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले होते. तिथेच त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार करण्यात आले होते. उपचारानंतर त्याने साकिनाका पोलिसांना घडलेला प्रकार सांगून विकी तांबे आणि त्याचा मित्र गुलाब शेख यांच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध गंभीर दुखापतीसह अन्य भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु असताना नरेश तांबेला शनिवारी पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला रविवारी दुपारी वांद्रे येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.