एसआरएचा स्वस्तात फ्लॅटच्या बहाण्याने जोडप्याची फसवणुक
30 लाखांच्या फसवणुकीप्रकरणी वॉण्टेड आरोपीस अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
17 मे 2026
मुंबई, – अंधेरीतील आंबोली परिसरात असलेल्या एसआरए इमारतीमध्ये स्वस्तात फ्लॅट देतो असे सांगून एका जोडप्याची सुमारे 30 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका वॉण्टेड आरोपीस डी. एन नगर पोलिसांनी अटक केली. राहुल राजेंद्र तिवारी असे या आरोपीचे नाव असून फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. राहुलला महेश तिवारी आणि महेश कारंडे यांनी मदत केल्याचे तपासात उघडकीस आल्याने त्यांना या गुन्ह्यात सहआरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या तिघांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
तायम्मा मल्लेश धनगर ही महिला अंधेरीतील धनगरवाडी परिसरात राहते. तिच्या पतीचा एम. टी मयुर ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यांना अंधेरी येथे एका फ्लॅटमध्ये गुंतवणुक करायची होती. त्यामुळे ते एसआरए किंवा म्हाडाच्या फ्लॅटचा शोध घेत होते. याच दरम्यान त्यांच्या नातेवाईकांमार्फत त्यांची राहुल तिवारी आणि महेश कारंडे यांच्याशी ओळख झाली होती. ते दोघेही एसआरएमधील पीओपीचे फ्लॅट स्वस्तात विक्री करत असल्याचे त्यांनी त्यांना सांगितले होते. मार्च 2025 रोजी गोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये त्यांनी या दोघांची भेट घेतली होती. यावेळी राहुल आणि महेशने त्यांना एसआरएमध्ये स्वस्तात फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते.
त्यांच्यात फ्लॅटची किंमत 45 लाख रुपये ठरली होती. सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांच्यात नोटरी दस्तावेज करण्यात आले होते. या दस्तावेजानंतर तायम्मा व तिचा पती मल्लेश धनगर यांनी राहुल आणि महेश यांना टोकन म्हणून दहा लाख रुपये दिले होते. ही रक्कम दिल्यानंतर त्यांनी त्यांना अंधेरीतील आंबोली, कैसर रोडवर असलेल्या ओम साई एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सोळाव्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1604 दाखविला होता. हा फ्लॅट आवडल्याने त्यांनी तोच फ्लॅट खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. याच फ्लॅटसाठी त्यांनी व्यवहार सुरु करुन त्यांना टप्याटप्याने आणखीन 20 लाख 50 हजार रुपये दिले होते.
जुलै 2025 रोजी त्यांनी त्यांना फ्लॅटच्या रजिस्ट्रेशनसाठी बायोमेट्रीकसाठी बोलाविले होते, मात्र नंतर सर्व्हर प्रॉब्लेम असल्याचे सांगून त्यांना घरी पाठविले होते. सप्टेंबर त्यांनी त्यांची महेश कारंडेशी ओळख करुन दिली होती. या दोघांनी महेश कारंडे हाच त्यांच्या फ्लॅटचे बायोमेट्रीकचे काम करणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसांनी या तिघांनी त्यांना ओम साई एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या फ्लॅटच्या दस्तावेजासह फ्लॅटची चावी दिली होती. फ्लॅटची चावी मिळताच ते दोघेही फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते. तिथे त्यांना फ्लॅटला बाहेरुन सील लावल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी एसआरए कार्यालयात संबंधित दस्तावेजाची शहानिशा केली होती. यावेळी त्यांना ते सर्व दस्तावेज बोगस असल्याचे समजले.
या तिघांनी स्वस्तात एसआरए फ्लॅट देतो असे सांगून 30 लाख 50 हजार रुपये घेऊन तायम्मा आणि मल्लेश धनगर यांची फसवणुक केली होती. या प्रकारानंतर त्यांनी तिन्ही आरोपींना जाब विचारला असता त्यांनी त्यांना दुसरीकडे फ्लॅट किंवा पैसे परत करण्याचे आश्वासन दिले. मात्र त्यांनी त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही किंवा त्यांचे फ्लॅटसाठी घेतलेले पैसेही परत केले नाही. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस येताच तायम्मा धनगर हिने डी. एन नगर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही आरोपीविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर राहुल तिवारी, महेश तिवारी आणि महेश कारंडे यांच्याविरुद्ध एसआरए फ्लॅटचे बोगस दस्तावेज बनवून सुमारे तीस लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या राहुल तिवारीला एक महिन्यानंतर पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.