कोलकाता सॉकेट बॉम्बस्फोटातील दोन संशयितांना अटक

दहशत निर्माण करण्यासाठी बॉम्बस्फोट घडविल्याचा आरोप

0

अरुण सावरटकर
17 मे 2026
मुंबई, – कोलकाता येथे झालेल्या विधानसभेनंतर बेहरामपूर परिसरात सॉकेट बॉम्बस्फोट घडवून मुंबईत पळून आलेल्या दोन संशयित आरोपींना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. रॉकी खान ऊर्फ आशिक रेहमान खान आणि शाहदत सौराब सरकार अशी या दोघांची नावे असून ते दोघेही कोलकाता येथील मुर्शिदाबादचे रहिवाशी आहेत. अटकेनंतर या दोघांनाही ट्रॉन्झिंट रिमांडवर बेहरामपूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या दोघांचा ताबा घेतल्यानंतर त्यांना पुढील कारवाईसाठी कोलकाता येथे नेण्यात आले आहे. केवळ दहशत निर्माण करण्यासाठी या दोघांसह त्यांच्या इतर सहकार्‍यांनी तीन सॉकेट बॉम्ब फेकले होते, त्यापैकी दोन बॉम्बचा स्फोट झाला तर एका बॉम्बला निकामी करण्यात बॉम्बशोधक व नाशक पथकाला यश आले होते. राजकीय वादातून या टोळीला बॉम्बस्फोट घडविण्यासाठी सांगण्यात आल्याचे बोलले जाते.

पशुपतीनाथ साहा हे मूळचे कोलकाताच्या मुर्शिदाबाद, बेहरामपूरच्या राधारघाट, माझरपाराचे रहिवाशी असून व्यवसायाने व्यापारी आहेत. त्यांचा बेहरामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किराणा मालाचे एक दुकान आहे. याच परिसरात एक आश्रम आणि माँ दुर्गा मातेचे एक मंदिर आहे. 12 मेला तिथे काही अज्ञात तरुण आले होते. या तरुणांनी तेथील इलेक्ट्रीक पोलवर लावण्यात आलेले राजकीय बॅनर फाडून टाकले होते. दुसर्‍या दिवशी पुन्हा काही तरुण तिथे आले आणि त्यांनी तीन सॉकेट बॉम्ब फेंकून पलायन केले होते. या तीनपैकी दोन बॉम्बचा स्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटानंतर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसने घटनास्थळी धाव घेतली होती.

संपूर्ण घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर या पथकाला तिथे एक सॉकेट सापडला होता. हा बॉम्ब नंतर बॉम्बशोधक व नाशक पथकाने निकामी केला होता. या बॉम्बस्फोटामुळे परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या बॉम्बस्फोटानंतर 14 मेला तीन तरुण एका बाईकवरुन आले होते. त्यांनी परशुपतीनाथ साहा यांना धमकावून याबाबत पोलिसांत तक्रार केली किंवा या घटनेची माहिती कोणाला सांगितली तर परिणाम वाईट होतील अशी धमकी दिली होती. या धमकीनंतर ते प्रचंड घाबरले होते. तरीही त्यांनी बेहरामपूर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून त्यांना संबंधित व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनंतर बेहरामपूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध 126 (2), 324 (4), 351 (3), 3 (5) भारतीय न्याय सहिता आणि 3, 4 स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्यांचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा आणि एटीएसचे अधिकारी संमातर तपास करत होते. याच गुन्ह्यांत काही संशयितांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत रॉकी खान आणि शाहदत सरकार यांचे नाव समोर आले होते. सॉकेट बॉम्बस्फोआनंतर ते दोघेही कोलकाता सोडून पळून गेले होते. कोलकाता येथून ते दोघेही मुंबईत जाणार असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर या दोघांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही शोधमोहीम सुरु असताना रॉकी आणि शाहदत हे दोघेही गितांजली एक्सप्रेसने ते दोघेही मुंबईसाठी निघाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर संबंधित पोलिसांनी मुंबई पोलिसांना संपर्क साधून या दोघांची माहिती सांगून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्याची विनंती केली होती. या माहितीनंतर गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाच्या अधिकार्‍यांनी शनिवारी बोरिवली रेल्वे स्थानकात साध्या वेशात पाळत ठेवली होती.

यावेळी तिथे आलेल्या रॉकी खान आणि शाहदत सरकार या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत कोलकाता येथे झालेल्या सॉकेत बॉम्बस्फोटात त्यांचा सहभाग उघडकीस आला होता. त्यानंतर त्यांच्या अटकेची माहिती बेहरामपूर पोलिसांना देण्यात आली होती. या माहितीनंतर बेहरामपूर पोलिसांचे एक विशेष पथक मुंबईत आले होते. रविवारी दुपारी दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांना कोर्टाने ट्रॉन्झिंट रिमांडवर पाठविले होते. ट्रॉन्झिंट रिमांड प्राप्त होताच या दोघांचा ताबा बेहरामपूर पोलिसांकडे सोपविण्यात आला होता.

सायंकाळी त्यांना या पोलिसांनी पुढील कारवाईसाठी कोलकाता येथे नेण्यात आले. तिथे त्यांना लोकल कोर्टात हजर केले जाणार आहे. या दोघांच्या चौकशीत ते दोघेही एका राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर केवळ दशहत निर्माण करण्यासाठी त्यांन सॉकेत बॉम्बस्फोट घडविल्याची कबुली दिली. त्यासाठी त्यांना कोणी आदेश दिले होते. या गुन्ह्यांत त्यांना इतर कोणी मदत केली. या कामासाठी काही आर्थिक व्यवहार झाला होता याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page