1.07 कोटीच्या फसवणुकीप्रकरणी मोबाईल व्यावसायिकाला अटक
होलसेलमध्ये घेतलेल्या मोबाईलच्या पेमेंटचा अपहार केल्याचा आरोप
अरुण सावरटकर
16 मे 2026
मुंबई, – क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे एक कोटीच्या मोबाईलचा पेमेंटचा अपहार करुन एका मोबाईल व्यावसायिकाची फसवणुक केल्याप्रकरणी दिलीप विरजी ठाकूर नावाच्या व्यावसायिकाला बोरिवली पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत निरंजन चावडा हा सहआरोपी असून त्याला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या दोघांनी बोगस स्टॅम्पचा वापर करुन तक्रारदार व्यावसायिकासह इतर होलसेल मोबाईल व्यावसायिकाकडून एक कोटी सात लाख रुपयांचे विविध कंपनीचे 407 मोबाईल घेऊन मोबाईलच्या पेमेंटचा अपहार केल्याचा आरोप आहे.
विनय जयंतीलाल मसराणी हे कांदिवलीतील आकुली रोडवर राहत असून त्यांचा रिटेलसह होलसेलमध्ये मोबाईल विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांची स्वतची पीएमव्ही टेलिकॅम्युनिकेशन नावाची एक खाजगी कंपनी आहे. कांदिवलीतील आकुर्ली रोडवर, कल्पतरु अॅव्हेन्यू इमारतीमध्ये त्यांचे एक मोबाईल शॉप आहे. याच शॉपमधून मोबाईलची खरेदी-विक्रीचे सर्व व्यवहार चालतात. याच व्यवसायातून त्यांची दिलीप ठक्कर आणि निरंजन चावडा यांच्याशी ओळख झाली होती. यातील दिलीपचा बोरिवलीतील इंद्रपस्थ शॉपिंग सेंटरमध्ये जलाराम मोबाईल तर निरंजनचा चामुंडा मोबाईल नावाचे दोन शॉप आहे. या ओळखीनंतर ते तिघेही चांगले मित्र झाले होते. त्यांनी विनय मसराणी यांना ते दोघेही पार्टनर असून त्यांच्यासोबत मोबाईलचा व्यवसाय करायचा असल्याची इच्छा व्यक्त केली होती.
त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी जुलै 2025 पासून त्यांना होलसेलमध्ये मोबाईल विक्री करण्यास सुरुवात केली होती. त्याचे पेमेंट वेळेवर करुन त्यांनीही त्यांचा विश्वास संपादन केला होता. याच दरम्यान या दोघांनी त्यांच्या क्रिश इंटरप्रायझेज आणि पीएमव्ही टेलिकॅम्युनिकेशन या कंपनीचे स्टॅम्प त्यांच्याकडे दिले होते. या स्टॅम्पचा वापर करुन ते दोघेही डिवाईन पेसिफिक इंडिया आणि जय जलाराम इंटरप्रायसेज कंपनीकर्डूीन मोबाईल फोन ऑर्डर करत होते. गेल्या काही महिन्यांत दिलीप ठक्करने 68 लाख 87 हजार 595 हजार रुपयांचे 342 मोबाईल तर निरंज चावडाने 38 लाख 58 हजार 500 रुपयांचे 165 मोबाईल असे 1 कोटी 7 लाख 46 हजार रुपयांचे एकूण 407 विविध कंपनीचे मोबाईल घेतले होते. मात्र त्याचे पेमेंट केले नाही.
जानेवारी महिन्यांत डिवाईन पेसिफिक इंडिया कंपनीचे मालक मनिष मटलानी हे त्यांच्या शॉपमध्ये आले होते. यावेळी त्यांनी दिलीप आणि निरंजन यांनी त्यांच्या क्रिश इंटरप्रायजेस आणि पीएमव्ही टेलिकॅम्युनिकेशन कंपनीच्या नावाने साठ लाखांचे मोबाईल घेऊन त्याचे अद्याप पेमेंट केले नसल्याची तक्रार केली होती. त्यांच्या नावाने संबंधित मोबाईलची डिलीव्हरी करण्यात आली होती, त्यामुळे त्यांच्याकडून त्यांना पेमेंट अपेक्षित असल्याचे सांगितले. मूळात विनय मसराणी यांनी मोबाईलची ऑर्डर दिली नव्हती. त्यांच्या नावासह बोगस स्टॅम्प बनवून दिलीपने विवो कंपनीचे 276, सॅमसंग कंपनीचे 66 असे 68 लाख 87 हजार 595 रुपयांचे 342 मोबाईल तर निरंजनने विवो कंपनीचे 140, सॅमसंग कंपनीचे 25 असे 38 लाख 58 हजार 500 रुपयांचे 165 मोबाईल घेतले होते.
या मोबाईलची या दोघांनी परस्पर विक्री करुन एक कोटी सात लाख रुपयांचा अपहार करुन त्यांची फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच विनय मसराणी यांनी बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दिलीप ठक्कर आणि निरंजन चावडा या दोघांविरुद्ध पोलिसांनी बोगस स्टॅम्प बनवून विनय मसराणीसह इतर होलसेल मोबाईल विक्रेत्याकडून मोबाईल ऑर्डर करुन त्यांची फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
या तक्रारीची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत दोन्ही मोबाईल व्यावसायिकाविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश बोरिवली पोलिसांना दिले होते. या आदेशानंतर या दोघांचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना शुक्रवारी दिलीप ठक्कर याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने ही फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला शनिवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत निरंजन चावडाला पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.