लोन ट्रान्स्फरच्या आमिषाने पर्सनल लोन काढून फसवणुक
कोरे धनादेश घेऊन लोनची रक्कम परस्पर ट्रान्स्फर करुन घातला गंडा
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
28 मे 2026
मुंबई, – फायनान्स कंपनीकडून फ्लॅट तारण ठेवून घेतलेल्या कर्जावर व्याजदर जास्त असल्याने लोन ट्रान्स्फर करुन देतो असे सांगून पर्सनल लोन काढून एका महानगरपालिकेच्या कर्मचार्याची फसवणुक केल्याप्रकरणी वासुदेव सत्यवान पात्रा या भामट्याला एमएचबी पोलिसांनी अटक केली. लोनच्या अर्जासोबत स्वाक्षरी केलेले दोन धनादेश घेऊन त्याने पर्सनल लोनची रक्कम परस्पर स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन ही फसवणुक केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. वासुदेवने अशाच प्रकारे इतर काही फसवणुकीचे गुन्हे केले आहेत का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
51 वर्षांचे तक्रारदार संजय निवृत्ती शेडगे हे वसई येथे राहत असून महानगरपालिकेच्या आर सेंट्रल वॉर्डमध्ये चालक म्हणून काम करतात. त्यांच्या दोन्ही मुलांचा पेपर प्लेट बनविण्याचा व्यवसाय आहे. तीन वर्षांपूर्वी त्यांना वैयक्तिक कारणासाठी पर्सनल लोनची गरज होती. यावेळी त्यांनी त्यांच्या परिचित फायनान्स कंपनीत काम करणार्या मित्राकडे विचारणा केली होती. त्यांना पंधरा लाखांचे लोन हवे होते, त्यासाठी त्यांनी त्यांचे राहते घर तारण ठेवण्याची तयारी दर्शविली होती. यावेळी या मित्रासोबत वासुदेव पात्रा हा त्यांच्या घरी आला होता. या दोघांनी त्यांना घर तारण ठेवून लोन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर वासुदेवने त्यांचे कागदपत्रे घेऊन एका फायनान्स कंपनीत लोनसाठी अर्ज केला होता.
काही दिवसांनी त्याने त्यांना 14 लाख 29 हजार 206 रुपयांचे कर्ज मंजूर करुन दिले होते. त्यामुळे त्यांचा वासुदेववर विश्वास बसला होता. मात्र या फायनान्स कंपनीचे व्याज जास्त असल्याने त्यांनी त्याला दुसर्या बँकेत लोनची रक्कम ट्रान्स्फर करुन देण्याची विनंती केली होती. त्यानेही त्यांना दुसर्या बँकेत लोन ट्रान्स्फर करुन कमीत कमी व्याजदर मिळेल याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत त्यांची बोरिवलीतील न्यू लिंक रोडवरील एका हॉटेलमध्ये मिटींग झाली होती. 10 जून 2024 रोजी झालेल्या मिटींगमध्ये संजय शेडगे याने वासुदेवला त्यांचे पेमेंट स्लिप, बँक स्टेटमेंट, आधार-पॅन कार्ड आणि दोन कोरे धनादेश स्वाक्षरी करुन घेतले होते.
तिथे त्याने त्यांच्याकडून लोनसाठी अर्ज भरुन घेतला. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी अर्जावर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर कागदपत्रे घेऊन तो निघून गेला. याच दरम्यान त्यांच्या मोबाईलवर बँकेचा एक ओटीपी क्रमांक आला होता, तो ओटीपी क्रमांक त्यांनी वासुदेवला शेअर केला. 25 जून 2024 रोजी त्यांची पत्नी आजारी असल्याने ते तिच्यासोबत हॉस्पिटलमध्ये गेले होते. यावेळी त्यांना त्यांच्या मोबाईलवर 5 लाख 71 हजार 167 रुपये जमा झाल्याचा एक मॅसेज प्राप्त झाला होता. जुलै महिन्यांत त्यांच्या बँक खात्यातून कर्जाचा हप्ता डेबीट झाला होता. मात्र पत्नीच्या आजारपणामुळे त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
याच दरम्यान त्यांनी वासुदेवकडे लोनविषयी विचारणा केली असता त्याने लोनची प्रोसेसिंग सुरु असल्याचे सांगितले. दुसर्या दिवशी त्यांच्या बँक खात्यातून 15 हजार 220 रुपये डेबीट झाले होते. लोनची प्रोसेसिंग फी डेबीट झाल्याचे समजून त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. बरेच दिवस उलटूनही वासुदेवने त्यांच्या लोनचे काम केले नव्हते. त्यामुळे त्यांनी त्याला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्यांना प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्यांनी बँकेत जाऊन त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रक्कमेबाबत चौकशी केली होती. यावेळी त्यांना त्यांच्या बँक खात्यात एका फायनान्स कंपनीकडून लोनची रक्कम जमा झाल्याचे तसेच नंतर तीच रक्कम दुसर्या बँक खात्यात ट्रान्स्फर झाल्याचे समजले.
चौकशीदरम्यान त्यांना वासुदेवने त्यांच्या नावाने एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन, कर्जाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होताच ती रक्कम त्यांनी दिलेल्या दोन कोरे धनादेशाद्वारे स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन त्यांची फसवणुक केल्याचे समजले. या कर्जाचे हप्ते त्यांच्या बँक खात्यातून डेबीट होत होते. त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन वासुदेवने त्यांचे लोन दुसर्या बँकेत ट्रान्स्फर करतो असे सांगून त्यांच्याकडून लोनसाठी अर्ज भरुन, कोरे धनादेश घेतल्यानंतर कर्जाची रक्कम प्राप्त होताच ती रक्कम स्वतच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करुन फसवणुक केली होती. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी एमएचबी पोलिसांत वासुदेव पात्रा याच्याविरुद्ध तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. तो नालासोपारा येथे राहत असल्याने त्याचा तिथे पोलिसांनी शोध घेतला, मात्र तो सापडला होता. गेल्या सहा महिन्यांपासून वॉण्टेड असलेल्या वासुदेव पात्रा याला तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने पर्सनल लोनच्या रक्कमेचा परस्पर अपहार करुन संजय शेडगे यांची फसवणुक केल्याची कबुली दिली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली होती.