झोपेतच मोठ्या भावावर चाकूने वार करणार्या भावाला अटक
आईशी वाद घालून पैशांची मागणी केल्याचा जाब विचारला म्हणून हल्ला
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जून 2026
मुंबई, – झोपेत असलेल्या मोठ्या भावाच्या गळ्यावर चाकूने हल्ला करुन पळून गेलेल्या भावाला डोंगरी पोलिसांनी अटक केली. हैदरअली काढू शेख असे या आरोपी भावाचे नाव असून अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. हैदरअली हा दारुसह ड्रग्जच्या आहारी गेला असून पैशांवरुन आईशी वाद घालतो म्हणून त्याचा भाऊ खैरुलअली काढू शेखने त्याला जाब विचारुन कानशिलात लगावली होती, याच रागातून त्याने हा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
खैरुलअली काढू शेख हा डोगरीतील रायचूर स्ट्रिट परिसरात राहत असून लेबर म्हणून काम करतात. हैदरअली हा त्यांचा लहान भाऊ असून तो टेम्पोचालक म्हणून काम करतो. अनेकदा तो त्यांच्यासह घरातील इतर मंडळीशी वाद घालून भांडण करत असतो. लहान भाऊ असल्याने त्याच्याकडे इतर भावंड दुर्लक्ष करत होते. गुरुवारी त्याला हैदरअली वाडीबंदर ब्रिजवर भेटला होता. यावेळी त्याने त्याला आईशी वाद घालून तिच्याकडे सतत पैशांची मागणी का करतोस अशी विचारणा केली होती. त्याचा राग आल्याने त्याने त्यांना शिवीगाळ करुन बघून घेण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर त्याने हैदरअलीच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर तो त्याच्या कामासाठी निघून गेला.
रात्री उशिरा तो त्यांच्या कुटुंबियांसोबत वाडीबंदर, नंदलाल जानी मार्गावरील मोकळ्या जागेवर झोपला होता. रात्री तीन वाजता तिथे हैदरअली आला आणि त्याने झोपेतच खैरुनअलीच्या गळ्यावर चाकूने वार केले होते. झोपेतून जाग आल्यानंतर त्याला त्याच्या गळ्यातून रक्त येत असल्याचे तसेच समोर हैदअली हा चाकू घेऊन पळून जाताना दिसला. रक्तबंबाळ अवस्थेत त्याला त्याच्या कुटुंबियांनी तातडीने जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथेच त्याच्यावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. या घटनेची माहिती मिळताच डोंगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी खैरुलअलीची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली होती.
या जबानीनंतर पोलिसांनी हैदरअलीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या हैदरअलीला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने त्याच्या भावावर चाकूने हल्ला केल्याची कबुली दिली. त्याला दारुसह नशा करण्याचे व्यसन होते. त्यासाठी तो सतत पैशांची मागणी करत होता. पैसे दिले नाहीतर तो आईसह भावांशी वाद घालत होता. त्यातच भावाने कानशिलात लगावली म्हणून रागाच्या भरात त्याने त्याच्यावर हल्ला केला होता. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.