जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिला म्हणून तीन वेटरवर हल्ला

शिवडीतील घटना; हत्येच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यांत तिघांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
2 जून 2026
मुंबई, – हॉटेल बंद झाल्यानंतर जेवणाची ऑर्डर घेण्यास नकार दिला म्हणून हॉटेलच्या तीन वेटरवर तिघांनी चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची घटना शिवडी परिसरात घडली. या हल्ल्यात शहाबुद्दीन शफीक खान, सद्दाम खान आणि सलीम खान हे तिघेही जखमी झाले असून त्यांच्यावर केईएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. या तिघांच्या पोटाला आणि कमरेला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. सुजल शिवाजी मांजेकर, कार्तिक कैलास पठारे आणि कल्पेश कैलास पठारे अशी या तिघांची नावे असून ते तिघेही वडाळ्यातील रहिवाशी आहेत. अटकेनंतर तिन्ही आरोपींना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना शनिवारी 30 मेला रात्री तीन वाजता शिवडीतील शिवडी क्रॉस रोड, पठाण मशिदीसमोरील रेहमानिया हॉटेलमध्ये घडली. शहाबुद्दीन खान हा याच परिसरातील चर्बी चाळीत राहत सून रेहमानिया हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम करतो. शनिवारी रात्री हॉटेल बंद झाल्यानंतर शहाबुद्दीन हा त्याच्या सहकार्‍यासोबत साफसफाईचे काम करत होता. रात्री तीन वाजता तिथे सुजल, कार्तिक आणि कल्पेश हे तिघेही आले होते. या तिघांनी त्यांना अंडा घोटाला बनविण्यास सांगितले. मात्र त्याने हॉटेल बंद झाला आहे, कुक हॉटेलमधून निघून गेला आहे. त्यामुळे आता त्यांना जेवण देणे शक्य नाही असे सांगितले.

त्याचा राग आल्याने या तिघांनी त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली होती. रागाच्या भरात या तिघांनी शहाबुद्दीनवर पोटात चाकूने भोसकले. यावेळी तिथे सद्दाम आणि सलीम आले आणि त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी त्यांच्यावरही चाकूने प्राणघातक हल्ला केला होता. त्यात सद्दामला पोटात तर सलीमला पोटासह कमरेला गंभीर दुखापत झाली होती. या हल्ल्यानंतर तिन्ही आरोपी तेथून पळून गेले होते.

ही माहिती मिळताच रफि अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या तिघांनाही पोलिसांनी तातडीने जवळच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.याप्रकरणी शहाबुद्दीनची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्याच्या जबानीतून घडलेला प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या तिन्ही आरोपींना पोलिसांनी काही तासांत अटक केली.

तपासात ते तिघेही वडाळ्यातील ग. द आंबेकर, जय शिवाजीनगरचे रहिवाशी आहे. यातील सुजल हा शिक्षण घेत असून कार्तिक आणि कल्पेश हे दोघेही मासे विक्रीचे काम करतात. जेवण देण्यास नकार दिला म्हणून या तिघांनी शहाबुद्दीनसह त्याच्या दोन सहकार्‍यावर चाकूने प्राणघातक हल्ला केल्याची कबुली दिली. अटकेनंतर या तिघांनाही रविवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page