सरकारी नोकरीच्या आमिषाने महिलेची पंधरा लाखांची फसवणुक
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ लिपीकाविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
४ जून २०२६
मुंबई, – सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांसाठी नोकरी भरती असल्याची बतावणी करुन स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक पदावर नोकरीची ऑफर देऊन एका महिलेची पंधरा लाखांची फसवणुक झाल्याचा प्रकार मलबार हिल परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाचा वरिष्ठ लिपीक झुंबर भगवान घाडगे याच्याविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. झुंबर हा सरकारी अधिकारी असल्याने त्याने अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून त्याचा संमातर तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
योगिता सुरेश मोरे ही महिला मलबार हिल येथे तिच्या पतीसह दोन मुलांसोबत राहते. तिचे पती लोकभवन येथे लिपीक म्हणून काम करतात. झुंबर हा तिच्या परिचित असून तिचे काका आबासाहेब गव्हाणे यांचा मित्र आहे. ते दोघेही सार्वजनिक बांधकाम विभागात कामाला असल्याने त्यांची चांगली मैत्री होती. झुंबर धाराशिव येथील सार्वजनिक बांधकाम विभागात वरिष्ठ लिपीक म्हणून काम करत होता. मे २०२३ साली तो तिच्या घरी आला होता. त्याने तिला त्याची सार्वजनिक बांधकाम विभागातील मंत्र्याचे खाजगी सचिव यांच्याशी त्याची चांगली ओळख आहे.
या विभागात लवकरच वेगवेगळ्या जागांसाठी भरती होणार आहे. त्यात लिपीक, वरिष्ठ लिपीक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आणि इतर अभियंता पदांचा समावेश आहे. ही परिक्षा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणार नसून थेट सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणार आहे. या विभागातील खाजगी सचिव, अभियंते त्याच्या परिचित असल्याने त्यांनी त्याचे अनेक काम केले आहे. तसेच या परिक्षेच्या औरंगाबाद विभागाची त्याच्यावर असल्याचे सांगितले. त्याने तिला स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदासाठी नोकरीची ऑफर दिली होती.
सरकारी नोकरी मिळत असल्याने तसेच झुंबड घाडगे हा तिच्या परिचित असल्याने तिनेही त्याला नोकरीसाठी होकार दर्शविला होता. ऑक्टोंबर २०२३ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नोकरी भरतीची जाहिरात आली होती. त्यासाठी तिने परिक्षेचा अर्ज भरला होता. त्याने तिचे शंभर टक्के काम होणार असल्याची बतावणी करुन तिच्याकडे पैशांची मागणी सुरु केली होती. तिनेही त्याला टप्याटप्याने नोकरीसाठी पंधरा लाख रुपये दिले होते. मात्र परिक्षेच्या अंतिम निकालामध्ये तिच्या नावाचा उल्लेख नव्हता.
त्यामुळे तिने त्याला कॉल करुन विचारणा केली असता त्याने तिचे कॉल घेतले नाही. त्यामुळे ती त्याच्या धाराशिव येथील घरी गेली होती, मात्र त्याचे घर बंद होते. मुंबईत परत आल्यानंतर तिने त्याच्याकडे नोकरीसाठी घेतलेल्या पंधरा लाखांची मागणी सुरु केली. मात्र तो तिला विविध कारण सांगून टाळत होता. तरीही ती कॉल करुन त्याच्याकडून पाठपुरावा करत होती. यावेळी त्याने तिने पैशांसाठी कॉल केल्यास आत्महत्या करुन तिचे नाव सुसायट नोटमध्ये देण्याची धमकी दिली होती.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने मलबार हिल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून झुंबर घाडगे याच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी सरकारी नोकरीच्या आमिषाने पंधरा लाखांचा अपहार करुन फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून झुंबरची पोलिसांकडून लवकरच चौकशी होणार आहे. सरकारी नोकरीच्या आमिषाने त्याने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसाकडून तपास सुरु आहे.