३.६० कोटीच्या हिर्यांचा अपहार करुन डिलीव्हरी बॉयचे पलायन
गुन्हा दाखल होताच डिलीव्हरी बॉयच्या अटकेसाठी शोधमोहीम
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जून २०२६
मुंबई, – वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स कार्यालयातून डिलीव्हरीसाठी घेतलेल्या ३ कोटी ६० लाख रुपयांच्या हिर्यांचा अपहार करुन कंपनीच्या डिलीव्हरी बॉयने पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दिलीपघर बाबूघर गोस्वामी या डिलीव्हरी बॉयविरुद्ध बीकेसी पोलिसांनी हिर्यांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.
मितुल प्रकाश पटेल हे हिरे व्यापारी असून ते सध्या चर्नीरोड येथे त्यांच्या कुटुंबियांसोबत राहतात. त्यांची एस. एम सिक्युअर लॉजिस्टिक्स नावाची एक खाजगी कंपनी असून या कंपनीचे मुख्य कार्यालय चर्नीरोड येथील ऑपेरा हाऊस, पंचरत्न इमारतीमध्ये तर दुसरी शाखा वांद्रे येथील बीकेसी, भारत डायमंड बोर्स येथे आहे. ही कंपनीत मुंबई-सुरत आणि सुरत-मुंबई असा हिरे, सोने, सोन्याचे दागिने पाठविण्याचे आणि आणण्याचे काम करते. याच कंपनीत दिलीपघर गोस्वामी हा २४ वर्षांचा तरुण डिलीव्हरी बॉय म्हणून कामाला आहे.
२० मेला कंपनीला मुुंबईहून सुरतला ३ कोटी ६० लाख ४८ हजार ६८३ रुपयांचे ११७ कॅरेटचे हिरे पाठविण्याची ऑर्डर प्राप्त झाली होती. त्यामुळे कंपनीने दिलीपघरला सायंकाळी पाच वाजता बीकेसी येथील कार्यालयात पाठविले होते. तेथून हिरे घेऊन त्याला चर्नीरोड येथील मुख्य कार्यालयात येण्यास सांगण्यात आले होते. मात्र बराच वेळ होऊन दिलीपघर हा हिर्यांचे पार्सल घेऊन आला नाही. त्यामुळे कंपनीचे कर्मचारी उमंग पटेल यांनी त्याला संपर्क साधला होता, मात्र त्याचा मोबाईल बंद येत होता.
हा प्रकार संशयास्पद वाटताच मितुल पटेल यांनी बीकेसी कार्यालयातील सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात त्यांना दिलीपघर हा त्यांच्या कार्यालयात आल्याचे तसेच हिर्याचे पार्सल घेऊन कार्यालयातून निघून जात असल्याचे दिसून आले. त्यानंतर तो चर्नीरोडच्या कार्यालयात आला नाही. अचानक त्याचा मोबाईल बंद झाला होता. त्यामुळे त्याचा कोणाशी संपर्क होऊ शकला नाही.
बीकेसीहून चर्नीरोड येथील कार्यालयात ३ कोटी ६० लाख रुपयांचे हिरे आणण्यासाठी गेलेला दिलीपघर कार्यालयात न येता हिर्यांचा अपहार करुन पळून गेला होता. हा प्रकार उघडकीस येताच मितुल पटेल यांनी बीकेसी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दिलीपघर गोस्वामी याच्याविरुद्ध हिर्यांचा अपहार केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तो पळून गेल्याने त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.