कंपनीचे बोगस पेज तयार करुन शेअरमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गंडा

सव्वादोन कोटीच्या फसवणुकीप्रकरणी सायबर ठगाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जून २०२६
मुंबई, – कंपनीचे बोगस पेज तयार करुन शेअरमध्ये गुंतवणुकीवर चांगला परताव्याच्या आमिषाने एका ६० वर्षांच्या वयोवृद्ध महिलेची अज्ञात सायबर ठगाने सुमारे सव्वादोन कोटीची फसवणुक केल्याचा प्रकार माटुंगा परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात सायबर ठगाविरुद्ध मध्य प्रादेशिक विभागाच्या अधिकार्‍यांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून ज्या बॅक खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर झाली आहे, त्यांची माहिती काढली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

६० वर्षांची वयोवृद्ध तक्रारदार महिला रिटा विपुल गंगर ही महिला माटुंगा येथे राहत असून ती विणकाम करण्याचे क्लासेस घेते. १ मार्चला ती तिच्या घरी होती. यावेळी तिला एका अज्ञात व्यक्तीने काऊंटीफ्लाईग वेल्थ टेन्ड या खाजगी कंपनीच्या व्हॉटअप ग्रुपमध्ये ऍड केले होते. या गु्रपमध्ये प्रोफेसर एस. पी कोठारी हे सभासदांना विविध शेअरची माहिती देऊन कुठल्या शेअरमध्ये गुंतवणुक केल्यास त्यांना चांगला फायदा होईल याचीम माहिती देत होते. त्यांनी रिटा गंगर हिला अनेकदा कॉल करुन शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला दिला होता, या गुंतवणुकीवर तिला चांगला परतावा मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यांच्यावर विश्‍वास ठेवून त्यांनी कंपनीत एक खाते सुरु करुन त्यात गुंतवणुक सुरु केली होती.

सुरुवातीला तिला गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळत गेला. त्यामुळे तिला त्यांच्यावर विश्‍वास बसला होता. त्यानंतर तिने कंपनीच्या ऍपवर विविध शेअरमध्ये आणखीन गुंतवणुक केली होती. तिला तिच्या प्रत्येक गुंतवणुकीवर चांगला फायदा होत होता. त्यामुळे तिने शेअरमध्ये आणखीन गुंतवणुकीचा निर्णय घैतला होता. याच दरम्यान एस. पी कोठारीने तिला आयपीओ विकत घेण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे तिला जास्त फायदा होईल असे सांगितले. त्यामुळे तिने आयपीओ खरेदीसाठी २७ लाखांची गुंतवणुक केली होती. अशा प्रकारे तिने १ मार्च ते २० मे २०२६ या कालावधीत विविध शेअरसह आयपीओसाठी २ कोटी २० लाख ६० हजार ४०० रुपयांची गुंतवणुक केली होती.

या गुंतवणुकीवर तिला २१ कोटीचा फायदा झाला होता. त्यातील अकरा कोटी तिच्या बँक खात्यात तर दहा कोटी तिच्या मुलाच्या बँक खात्यात जमा झाल्याचे ऍपवरुन दिसत होते. त्यामुळे तिने तिच्या मुलाच्या खात्यातून काही रक्कम काढण्याचा प्रयत्न केला, मात्र वारंवार प्रयत्न करुनही तिला ती रक्कम काढता येत नव्हती. याबाबत एस. पी कोठारीला मॅसेजद्वारे तक्रार केली असता त्याने तिला पैसे काढण्यासाठी व्हीआयपी मेंबरशीप घेऊन पंधरा लाख रुपये भरावे लागतील असे सांगितले. ही रक्कम भरली नाहीतर तिला तिची रक्कम काढता येणार नाही.

हा प्रकार संशयास्पद वाटल्याने तिने व्हीआयपी मेंबरशीप घेण्यास नकार दिला. त्यानंतर त्यांनी तिच्याशी संपर्क साधणे बंद केले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने मध्य सायबर सेल पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित सायबर ठगाविरुद्ध पोलिसांनी भारतीय न्याय सहिता आणि आयटीच्या विविध कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

प्राथमिक तपासात या ठगांनी रिटा गंगरसह तिच्या मुलाच्या नावाने बोगस पेजसह खाते तयार करुन ही फसवणुक केल्याचे उघडकीस आले आहे. तिने वेगवेगळ्या बँक खात्यात २ कोटी २० लाख ६० हजाराची रक्कम ट्रान्स्फर केली आहे, त्यामुळे या बँक खात्यासह खातेदारांची माहिती काढली जात आहे. या खातेदारांवर लवकरच कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page