मालाड येथे २४ वर्षांच्या तरुणाची हत्या तर हल्ल्यात तीनजण जखमी
दशहत निर्माण करणार्या जाब विचारला म्हणून हल्ला केल्याचे उघड
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जून २०२६
मुंबई, – मालाड येथे आकाश राजू धोत्रे या २४ वर्षांच्या तरुणाची तिक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या करण्यात आली. या हल्ल्यात इतर तिघेजण जखमी झाले असून त्यांच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. जखमीमध्ये रमेश राजू धोत्रे, अमीत सुभाष मिश्रा आणि आताश सतीश सिंग यांचा समावेश आहे. याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करुन दोन आरोपींना अटक केली आहे. महेंद्र रामआशिष शहाणी आणि विरेंद्र रामआशिष शहाणी अशी या आरोपी बंधूंची नावे आहेत. परिसरात दशहत निर्माण करणार्या आरोपींना जाब विचारला म्हणून त्यांनी मृत आणि जखमी तरुणांवर चॉपरने हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या दोघांनाही सोमवारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेने परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
ही घटना रविवारी ७ जूनला दुपारी एक वाजता मालाड येथील कुरार व्हिलेज, आप्पापाडा रिक्षा स्टॅण्डसमोर घडली. आकाश धोत्रे हा याच परिसरातील आंबेडकरनगर, शिवशक्ती मित्रमंडळात राहतो. दोन्ही आरोपी तिथेच असून त्यांची परिसरात प्रचंड दशहत आहे. त्यांच्या दशहतीमुळे त्यांच्याविरुद्ध कोणीही तक्रार करत नव्हते. रविवारी दुपारी महेंद्र, विरेंद्रसह इतर काही तरुण परिसरात चॉपर घेऊन हुल्लडवाजी करत होते. त्यांची दादागिरी सुरु असल्याने त्यांना मृत आणि जखमी तरुणांनी जाब विचारला होता. तसेच शांत राहण्याचा सल्ला दिला होता.
याच कारणावरुन त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर आरोपींनी आकाशसह इतर तिघांवर चॉपरने प्राणघातक हल्ला केला. त्यात ते चौघेही गंभीर जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर सर्व आरोपी तेथून पळून गेले होते. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी चौघांनाही तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे आकाश धोत्रे याला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर त्याचा भाऊ रमेश धोत्रे, दोन मित्र अमीत मिश्रा आणि आतिश सिंग यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते.
याप्रकरणी कुरार पोलिसांनी हत्येसह हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना काही तासात महेंद्र शहाणी आणि विरेंद्र शहाणी या दोन्ही आरोपी बंधूंना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यांतील चॉपर पोलिसांनी हस्तगत केले आहेत. याच गुन्ह्यांत त्यांना सोमवारी दुपारी बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करुन त्यांची पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.