आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने तस्करी टोळीचा पर्दाफाश
भाजपा पदाधिकार्यासह सातजणांना पाच कोटीच्या सोन्यासह अटक
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जून २०२६
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरु असलेल्या सोने तस्करीचा महसूल गुप्तवार्ता संचानलाच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. याच गुन्ह्यांत विमानतळावरील कर्मचार्यासह सातजणांना या अधिकार्यांनी अटक केली आहे. अजीत सत्यवान आचरेकर, रोहितकुमार अवधेशकुमार सिंग, संतोष सुभाष पोल, समीउल्ला सफीउल्ला शाह, हमीद लेबीफ खान, फलील मोहम्मद कासिम आणि मोहम्मद कावसार मोहम्मद कसेम अशी या सातजणांची नावे आहेत. यातील अजीत आचरेकर हा भाजपाचा पदाधिकारी असून तो विमानतळावरील एका खाजगी कंपनीत कामाला होता. या सातही आरोपींकडून या अधिकार्यांनी पाच कोटी एक लाख रुपयांचे सोने जप्त केले आहेत. अटकेनंतर या सर्वांना किल्ला कोर्टाने चौदा दिवसांची न्याायलयीन कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत विदेशातून मोठ्या प्रमाणात ड्रग्जसहीत सोन्याची तस्करी होत असल्याने अशा तस्कराविरुद्ध सुरक्षा यंत्रणेने विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावरील काही कर्मचारी विदेशातून सोने तस्करी करणार्या प्रवाशांना मदत करत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे या कर्मचार्यावर या अधिकार्यांनी विशेष लक्ष ठेवून त्यांची माहिती काढण्यास सुरुवात केली होती. ही कारवाई सुरु असताना या अधिकार्यांनी विमानतळाजवळील हॉटेलजवळ सापळा लावला होता. यावेळी अजीत आचरेकर, रोहितकुमार सिंग आणि संतोष पोल याने एक बॅग समीउल्लाला दिली होती.
हा प्रकार निदर्शनास येताच चारही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची चौकशी केल्यानंतर ते चौघेही सोने तस्करीच्या गुन्ह्यांत सहभाग असल्याचे उघडकीस आले होते. या कारवाईत या अधिकार्यांनी तीन कॅप्सुल जप्त केल्या आहेत. त्यात मेण स्वरुपातील सोने होते. चौकशीदरम्यान एका बांगलादेशी नागरिकाने बँकॉंक ते मुंबई असा प्रवास केला होता. यावेळी हॅण्डलरने त्या प्रवाशाचा फोटो रोहितला पाठवून त्याला मदत करण्याची सूचना केली होती. त्यानंतर इतर दोन श्रीलंका नागरिकांची माहिती त्यांना देण्यात आली होती. तपासात आलेल्य या माहितीनंतर या अधिकार्यांनी हमीद खान, फलील कासिम आणि मोहम्मद कावसार या तिघांना ताब्यात घेतले होते.
तपासात त्यांनी दुबई, बँकॉंक येथून सोने तस्करी केल्याची कबुली दिली. या कारवाईत त्यांच्याकडून या अधिकार्यांनी ३३१८ ग्रॅम वजनाचे सोने जप्त केले असून त्याची पाच कोटी रुपये किंमत आहे. या सर्वांविरुद्ध सीमा शुल्क कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत नंतर त्यांना या अधिकार्यांनी अटक केली. यातील अजीत आचरेकर, संतोष पोल आणि रोहित सिंग हे तिघेही छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कामााला आहेत. ते तिघेही विदेशात सोने तस्करी करणार्या प्रवाशांना मदत करुन त्यांनी आणलेले सोने विमानतळाबाहेर आणून देत होते.
अजीत हा लोअर परेल येथील इन्कम टॅक्स इमारतीसमोरील लालबाग परिसरात असून तो भाजपाच्या कामगार संघटनेचा पदाधिकारी आहे. सोने तस्करीच्या गुन्ह्यांत भाजपा पदाधिकार्याला अटक झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपाप्रणित कामगार संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड खळबळ उडाली होती. अटकेनंतर या सर्वांना रविवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत इतर काही आरोपींची नावे समोर आली असून त्यांच्या अटकेसाठी या अधिकार्यांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.