गांजा तस्करीप्रकरणी २० वर्षांच्या तरुणीला अटक

४१ लाखांचा ८३ किलो गांजाचा साठा जप्त

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जून २०२६
मुंबई, – राहत्या घरातून गांजाची तस्करी करणार्‍या एका २० वर्षांच्या तरुणाला घाटकोपर युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. सोनाली हमीद राऊतर असे या तरुणीचे नाव असून तिच्यासह तिच्या आईच्या घरातून या अधिकार्‍यांनी ८३ किलो गांजाचा साठा जप्त केला आहे. त्याची किंमत सुमारे ४१ लाख रुपये इतकी आहे. तिच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर तिला किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

सोनाली नावाची एक महिला मानखुर्द येथील महाराष्ट्रनगर, व्हिलेज मंडाळा, इमारतीमध्ये राहत असून ती तिच्या राहत्या घरातून गांजाची विक्री करत असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या ऍण्टी नारकोटीक्स सेलला प्राप्त झाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलीस आयुक्त देवेन भारत, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिरडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर पाटील, भगवान बेले, पोलीस हवालदार रावते, वाडिले, पोलीस शिपाई पंडित, गर्जे, महिला पोलीस शिपाई वर्षा ब्राम्हणे, मुलानी आदी पथकाने इमारत क्रमांक अठराच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ५०८ मध्ये छापा टाकला होता.

यावेळी फ्लॅटमध्ये असलेल्या सोनालीला पोलिसांनी ताब्यात घेतले. संपूर्ण फ्लॅटची तपासणी केल्यानंतर या अधिकार्‍यांना बेडरुममध्ये काही ठोकळे दिसून आले. ते ठोकळे सेलोटेप लावून बंद करण्यात आले होते. त्याची तपासणी केल्यानंतर त्यात या अधिकार्‍यांना गांजाचा साठा सापडला. चौकशीदरम्यान तिने तो गांजा तिची आई हमीदा राऊतर हिचा असल्याचे सांगून ती बाजूच्याच इमारत क्रमांक २१ मध्ये राहत असल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने इमारत क्रमाक २१ आदर्श ए|१ एआरए सोसायटीच्या तिसर्‍या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ३१० मध्ये छापा टाकला होता. या फ्लॅटमधूनही पोलिसांनी गांजाचा साठा जप्त केला आहे.

या दोन्ही कारवाईत या अधिकार्‍यांनी ८३ किलो ४८७ ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून त्याची किंमत ४१ लाख ७४ हजार ३५० रुपये इतकी आहे. याप्रकरणी सोनालीविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर तिला पोलिसांनी अटक केली. तपासात सोनाली ही इतर राज्यातून गांजा आणून तिच्या राहत्या घरी ठेवत होती. मागणीनुसार ती गांजाची काही तस्कराच्या मदतीने विक्री करत होती. अटकेनंतर तिला किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते.

यावेळी कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली आहे. सोनालीने हा साठा कोठून आणला, तिला तो साठा कोणी दिला, ती गांजा कोणाला विक्री करत होते. ती कधीपासून गांजाची खरेदी-विक्री करते, या गुन्ह्यांत तिला कोण मदत करतो, तिची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे याची पापेलिसांकडून चौकशी सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page