नेस्को सेंटरनंतर एनएससीआय डोममधील कार्यक्रमांत तरुणाचा मृत्यू

अन्य एका महिलेची प्रकृती बिघडली; आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
७ जून २०२६
मुंबई, – गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील कार्यक्रमांक मद्यासह ड्रग्जचे सेवन केल्यामुळे दोन एमबीए विद्यार्थ्यांचा झालेल्या मृत्यूची घटना ताजी असताना हाजीअलीच्या एनएससीआय डोममध्ये शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका संगीत कार्यक्रमादरम्यान एका २८ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला. वृषभ गांगुर्डे असे या तरुणाचे नाव असून त्याने मद्यासह एनर्जी ड्रिंक्स घेतल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेनंतर एका महिलेची प्रकृती बिघडली होती, त्यामुळे तिला जसलोक हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. तिची प्रकृती आता स्थिर आहे. दरम्यान या घटनेची ताडदेव पोलिसांनी गंभीर दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे. रात्री उशिरा कार्यक्रमांच्या आयोजकासह इतराविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कार्यक्रमांत अनेकांनी मद्यप्राशन केले होते, कोणी ड्रग्ज घेतले होते का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.

गोरेगाव येथील नेस्को सेंटरमधील एका कॉन्सर्टमध्ये अलीकडेच दोन एमबीए विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या दोघांनी मद्यासह ड्रग्जचे सेवन केले होते. ड्रग्जचय अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच वनराईत पोलिसांनी अकराहून अधिक आरोपींना अटक केली होती. ते सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. ही घटना ताजी असताना हाजीअली येथील नॅशनल स्पोर्टस क्लब ऑफ इंडियाच्या डोममध्ये शनिवारी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांत हजारो तरुण-तरुणी सामिल झाले होते. कार्यक्रम सुरु असताना वृषभ गांगुर्डे या २८ वर्षांच्या तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला ब्रिचकॅण्डी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते, त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला नंतर आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.

या घटनेनंतर कार्यक्रमादरम्यान अशाच प्रकारे अन्य एका महिलेची प्रकृती बिघडली होती. त्यामुळे तिला जसलोक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. ही माहिती प्राप्त होताच ताडदेव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या महिलेची चौकशी केली होती. चौकशीत तिने मद्यासह एनर्जी ड्रिंक्स घेतल्याची कबुली दिली, तिने ड्रग्जचे सेवन केले नव्हते असेही तिच्या जबानीत सांगितले होते. तिची मेडीकल टेस्ट करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट लवकरच प्राप्त होणार आहे. दुसरीकडे वृषभच्या मृत्यूनंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला होता. तिथेच त्याच्या मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात आले, त्याचा अहवाल अद्याप पोलिसांना प्राप्त झाला नाही. त्याचा अहवाल आल्यानंतर काही गोष्टींचा खुलासा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

याप्रकरणी त्याच्या मित्रांची पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. या चौकशीत त्यांनी मद्यप्राशन तसेच एनर्जी ड्रिंक्स घेतल्याची कबुली दिली. त्यांनीही ड्रग्जचे सेवन केले नसल्याचे सांगितले. या घटनेनंतर कार्यक्रमांतील सीसीटिव्ही फुटेजसह डिव्हीआर पोलिीसांनी ताब्यात घेतले आहे. या फुटेजची पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. संगीत कार्यक्रमाच्या आयोजकासह इतर काहींना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून त्यांची जबानी नोंदविण्याचे काम सुरु आहे. या संगीत कार्यक्रमाला ताडदेव पोलिसांनी परवानगी दिली नव्हती. मात्र आयोजकांनी वरिष्ठ पातळीवर हालचाल करुन ही परवानगी घेतली होती.

कार्यक्रमांत मद्य सेवनाची परवानगी घेण्यात आली होती याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे. या कार्यक्रमासाठी काही हजार रुपयांचे शुल्क आकारण्यात आले होते. जवळपास पाच ते सहा तरुण-तरुणी कार्यक्रमाला उपस्थित होते. दुसरीकडे या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत ताडदेव पोलिसांना तपासाचे आदेश दिले आहे. या आदेशानंतर पोलिसांनी रात्री उशिरा कार्यक्रमांचे आयोजकासह इतराविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संबंधितांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page