फ्री सिनेमाचे गाजर दाखवून महिलेच्या बँक खात्यावर डल्ला

सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जून २०२६
मुंबई, – फ्री सिनेमाचे गाजर दाखवून एका महिलेच्या बँक खात्यावर अज्ञात सायबर ठगाने डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार दहिसर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी या सायबर ठगाविरुद्ध दहिसर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. टुली ऍपद्वारे फ्री सिनेमाची जाहिरात करुन या ठगाने तिचा मोबाईल हॅक करुन त्याचा ऍक्सेस मिळवून चार ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून सुमारे सव्वातीन लाखांची फसवणुक केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्ह्यांत स्थानिक पोलिसांसह सायबर सेलकडून तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

सोनल आकाश बोबडे ही ३६ वर्षांची तक्रारदार महिला तिच्या पती आणि मुलीसोबत दहिसर येथे राहत असून तिचे पती एका खाजगी कंपनीत कामाला आहे. ९ मेला ती इंटाग्रामवर सर्च करताना तिला टुबी नावाचा एक ऍप दिसला होता. या ऍपवर फ्री सिनेमा बघता येईल अशी जाहिरात करण्यात आली होती. त्यामुळे तिने ती लिंक ओपन करुन टुपी ऍप डाऊनलोड केले होते. ऍप डाऊनलोड केल्यानंतर तिला फ्रीमध्ये सिनेमा पाहत येत होते. १५ मेला दुपारी तीन वाजता ती मोबाईलवर सिनेमा पाहत होती, यावेळी तिचा मोबाईल अचानक हॅक झाला आणि एक तासानंतर अपडेट मोडवर गेला होता.

काही वेळानतर तिने तिचा मोबाईलची पाहणी केल्यानंतर तो आपोआप फॅक्टरी रिसेट झाला होता. त्यामुळे तिने गुगल पेवर जाऊन तिच्या बँक खात्याचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिला तिच्या बँक खात्यातून चार ऑनलाईन व्यवहार तसेच सव्वातीन लाख रुपये डेबीट झाल्याचे दिसून आले. ते चारही ऑनलाईन व्यवहार तिने केले नव्हते. तरीही तिचा मोबाईल आपोआप हॅक होऊन अज्ञात सायबर ठगाने तिच्या मोबाईलचा ऍक्सेस प्राप्त करुन ही फसवणुक केली होती.

फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तिने सायबर हेल्पलाईल क्रमांकासह दहिसर पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात सायबर ठगाविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर दहिसर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल करुन या सायबर ठगांचा शोध सुरु केला आहे. टुली ऍप डाऊनलोड झाल्यानंतर एका आठवड्यात हा प्रकार घडला होता. फ्री सिनेमाचे गाजर दाखवून या ठगाने तिच्या बँक खात्यावर डल्ला मारल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान या गुन्ह्यांचा दहिसर पोलिसांसह स्थानिक सायबर सेलचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page