अंधेरी रेल्वे स्थानकात २२ वर्षांच्या तरुणीची विनयभंग

प्रवाशासह रेल्वे पोलिसांच्या मदतीने आरोपीस अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
५ जून २०२६
मुंबई, – कामावर जाण्यासाठी अंधेरी रेल्वे स्थानकात आलेल्या एका २२ वर्षांच्या तरुणीचा जिना चढताना नकोसा स्पर्श करुन विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या तरुणीच्या आरडाओरडानंतर प्रवाशासह रेल्वे पोलिसांनी विनयभंग करणार्‍या ३२ वर्षांच्या आरोपीस शिताफीने अटक केली. विनयभंगाच्या कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर त्याला अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी सांगितले.

२२ वर्षांची बळीत तरुणी अंधेरीतील एका खाजगी कंपनीत कामाला आहे. गुरुवारी ४ जूनला ती नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी अंधेरी रेल्वे स्थानकात आली होती. सकाळी अकरा वाजता ती लोकलमधून उतरुन जिना चढून जात होती. यावेळी रेल्वे स्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन एका अज्ञात व्यक्तीने तिच्या मागून नकोसा स्पर्श करुन तिचा विनयभंग केला होता.

हा प्रकार लक्षात येताच तिने आरडाओरड करुन अन्य प्रवाशांच्या मदतीने पळून जाण्याचा प्रयत्नात असलेल आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी या प्रवाशांसह तिथे उपस्थित रेल्वे पोलिसांनी पळून जाणार्‍या आरोपीस ताब्यात घेतले होते. त्याला पुढील चौकशीसाठी अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. यावेळी या तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला अटक करुन दुपारी अंधेरीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.

यावेळी कोर्टाने त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याच्या वतीने त्याच्या वकिलांनी कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. तपासात आरोपी हा चर्चगेट येथील एका मेडीकल शॉपमध्ये काम करत असून गुरुवारी सकाळी तो चर्चगेटला कामावर जाण्यासाठी आला होता. यावेळी गर्दीचा फायदा घेऊन त्याने बळीत मुलीशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केला होता. या वृत्ताला वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन लोंढे यांनी दुजोरा दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page