झोपडमोड करणार्‍या मंदिराच्या वयोवृद्ध ट्रस्टीवर हल्ला

पळून गेलेल्या आरोपीविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जून २०२६
मुंबई, – मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर झोपणार्‍या तरुणांना सकाळी उठवून झोपमोड करतो या कारणावरुन रागाच्या भरात एका तरुणाने मंदिराच्या वयोवृद्ध ट्रस्टीचा गळा आवळून जिवघेणा हल्ला केल्याची घटना वरळी परिसरात घडली. या हल्ल्यात ६३ वर्षांचे विजय नारायण कदम यांच्या गळ्यावर दुखापत झाल्याने त्यांच्यावर पोद्दार हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी गौरेश राजभर या आरोपी तरुणाविरुद्ध दादर पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. हल्ल्यानंतर तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे.

६९ वर्षांचे विजय नारायण कदम हे त्यांची मानलेली मुलगी साक्षी पेडामकर हिच्यासोबत वरळी-कोळीवाड्यातील लक्ष्मी सदनमध्ये राहतात. गेल्या तेरा वर्षांपासून ते गोल्फादेवी रोड येथे असलेल्या संतोषी माता मंदिरातील ट्रस्टी म्हणून काम करतात. त्यामुळे ते सकाळी सहा वाजता उठूवन मंदिराचे गेट उघडून साफसफाई करतात. गुरुवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे मंदिरात आले होते. यावेळी त्यांना मंदिरासमोरील मोकळ्या जागेवर गौरेशसह इतर तीन मुले झोपल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी त्यांना झोपेतून उठवले आणि लोक दर्शनासाठी येणार असल्याने तेथून जाण्यास सांगितले.

काही वेळानतर त्यांनी मंदिर उघडून साफसफाई सुरु केली होती. दुकानातून दूध खरेदी करुन ते दहा मिनिटांनी मंदिरात परत आले होते. यावेळी त्यांना गौरेशसह इतर तिन्ही मुले पुन्हा झोपलेले दिसले. त्यामुळे त्यांनी त्यांना पुन्हा उठविले होते. त्याचा राग आल्याने गौरेशने त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली होती. हा म्हातारा दररोज झोपेतून उठवितो, झोपमोड करतो. त्याचा एकदाचा खेळ खल्लास करतो असे बोलून त्याने विजय कदम यांचयवर हल्ला केला होता.

त्याचा गळा जोरात आवळून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला होता. यावेळी गौरेशसोबत असलेल्या तिघांनी त्याला बाजूला केले होते. अचानक जोरात गळा आवळल्याने त्यांचा जीव गुदरमला होता. या प्रकाराने ते प्रचंड घाबरल होते. घरी गेल्यानंतर त्यांच्या मुलीला हा प्रकार समजला होता. त्यांच्या गळ्यावर नखे लागल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना तातडीने पोद्दार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

ही माहिती समजताच दादर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणार्‍या विजय कदम यांची पोलिसांनी जबानी नोंदवून घेतली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गौरेश राजभरविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. तो पळून गेल्याने त्याचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. झोपमोड करतो म्हणून विजय कदम यांच्यावर गौरेशने जिवघेणा हल्ला केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page