गोवंडीतील अनधिकृत शाळेविरुद्ध शिक्षण विभागाची कारवाई

संस्थाचालकासह मुख्याधापक, सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जून २०२६
मुंबई, – दोन नोटीस देऊनही गोवंडीतील सुरु असलेल्या अनधिकृत शाळेविरुद्ध शिक्षण विभागाने कारवाईला सुरुवात केली आहे. याप्रकरणी तेहजीब इस्लामिक इंग्लिश स्कूल या शाळेच्या संस्थाचालकासह मुख्याधापक आणि सचिवाविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून संबंधितांची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार आहे. या चौकशीनंतर या अनधिकृत शाळेच्या इमारतीवर महानगरपालिकेकडून कारवाई होणार आहे.

निसार अहमद अब्दुल सत्तार खान हे करीरोड येथे राहत असून सध्या महानगरपालिकेच्या खाजगी प्राथमिक शाळा विभागात उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. या विभागात शिक्षण संचानलायाच्या माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाकडून अनधिकृत शाळाबाबत तक्रारी येत असतात. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर संबंधित अनधिकृत शाळांवर योग्य ती कारवाई, शाळा बंद करुन शाळेच्या संस्थाचालक, मुख्याधापक, सचिव आदींना नोटीस पाठविली जाते.

गेल्या वर्षभरात त्यांच्या विभागात एकूण १६४ अनधिकृत प्राथमिक शाळांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यात एम पूर्व वॉर्डमधील गोवंडीतील बैंगनवाडी, जुना बस डेपोच्या तेहजीब इस्लामिक इंग्लिश स्कूल या शाळेचा समावेश होता. तिथे पहिली ते चौथी या वर्गासाठी तळमजला ते तीन मजली इमारतीमध्ये मुलांची शाळा सुरु होती. त्यामुळे तिथे संबंधित विभागाकडून पाहणी करण्यात आली हेती. ती शाळा अनधिकृत असल्याने संबंधितांना नोटीस देऊन सात दिवसांत खुलासा मागविण्यात आला होता. मात्र शाळेच्या संस्थाचालकासह मुख्याधापक आणि सचिवांनी नोटीसला उत्तर दिले नाही.

शाळा अनधिकृत असताना शाळा बंद केली नाही. नोटीस देऊन शाळा सुरु ठेवून त्यांनी नोटीसचे उल्लघंन केल्याचे तपासात उघडकीस आले होते. त्यामुळे या शाळेच्या संस्थाचालक, मुख्याधापक, सचिवाविरुद्ध शिक्षण विभागाकडून शिवाजीनगर पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीसोबत शाळा बंद करण्याची दोन वेळा बजाविण्यात आलेली नोटीस पुरावा म्हणून जोडण्यात आले होते.

या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर निसार अहमद खान यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी शाळेच्या संस्थाचालक, मुख्याधापक आणि सचिवाविरुद्ध बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम आणि भारतीय न्याय सहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करणयत आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने संबंधितांची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page