इस्टंट लोनच्या आमिषाने निवृत्त पोलिसाची ऑनलाईन फसवणुक
दोन लाखांच्या लोनसाठी प्रोसेसिंग फी घेतली अडीच लाख रुपये
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१२ जून २०२६
मुंबई, – इस्टंट लोनच्या आमिषाने एका निवृत्त वयोवृद्ध पोलीस कर्मचार्याची अज्ञात सायबर ठगाने सुमारे अडीच लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार दादर परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सोनूकुमार सिंग नाव सांगणार्या सायबर ठगाविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. इस्टंट लोनचे गाजर दाखवून या ठगाने संबंधित पोलीस कर्मचार्याची दोन लाखांच्या लोनसाठी प्रोसेसिंग फी म्हणून अडीच लाख ऑनलाईन घेऊन ही फसवणुक केल्याचे एका पोलीस अधिकार्याने बोलताना सांगितले.
६१ वर्षांचे रमेश चंद्रकांत रावराणे हे दादर येथील हिंदमाता सिनेमागृहासमोरील युनियन मेंशनमध्ये त्यांची पत्नी रुचिता आणि मुलगा अमेय यांच्यासोबत राहतात. ते मुंबई पोलीस दलातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या पेंशनवर त्यांच्या कुटुंबियांचा उर्दरनिर्वाह चालतो. २७ मार्चला ते त्यांच्या घरी होते. मोबाईल पाहत असताना त्यांना एका खाजगी बँकेचे इस्टंट लोनची एक जाहिरात दिसली होती. त्यात एका व्यक्तीचा मोबाईल क्रमांक होता. त्यांना दोन लाखांच्या लोनची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला होता.
यावेळी समोरुन बोलणार्या सोनूकुमार सिंगने त्यांना तो बँकेच्या लोन विभागातील कर्मचारी असल्याची बतावणी केली होती. त्यांनी त्याला दोन लाखांच्या लोनविषयी विचारणा केली असता त्याने त्यांना लोन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी त्याने प्रोसेसिंग सुरु केल्याचे सांगून त्यांच्याकडून त्यांची वैयक्तिक माहिती घेऊन काही कागदपत्रांची मागणी केली होती. त्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती, आधार-पॅनकार्ड तसेच इतर कागदपत्रे पाठवून दिली होती.
काही वेळानंतर त्याने त्यांना दोन लाखांचे लोन मंजूर झाल्याचे सर्टिफिकेट पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यासाठी त्यांना प्रोसेसिंग फीसह इतर फी करण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर लोनची रक्कम त्यांच्या बँक खात्यात ट्रान्स्फर होईल असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून त्यांनी त्याला वेगवेगळ्या कारणासाठी २ लाख ४७ हजार ३०० रुपये ट्रान्स्फर केले होते. त्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलाकडून काही रक्कम घेतली होती. मात्र ही रक्कम पाठवून त्याने त्यांना लोनची रक्कम पाठविली नाही. तो त्यांच्याकडे पुन्हा पैशांची मागणी करत होता.
हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्याचा मोबाईल ब्लॉक केला होता. काही वेळानंतर त्यांना दोन लाखांच्या लोनसाठी त्यांनी प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी सोनूकुमार सिंगला सुमारे अडीच लाख रुपये पाठविल्याचे समजले होते. फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस त्यांनी ही माहिती भोईवाडा पोलिसांना सांगून सोनूकुमार सिंग या आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे. इस्टंट लोनच्या आमिषाला बळी पडणे रमेश रावराणे यांना चांगलेच महागात पडले आहे.