आंतरराष्ट्रीय विमानतळावर पुन्हा बॉम्बच्या धमकीचा ईमेल

संपूर्ण तपासणीनंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१४ जून २०२६
मुंबई, – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवला असून या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल असा धमकीचा ईमेल शनिवारी सकाळी प्राप्त झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सुरक्षा यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. संपूर्ण विमानतळाची तपासणी केल्यानंतर बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले. दरम्यान या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत ईमेल पाठविणार्‍या व्यक्तीच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेला दिले आहे. याप्रकरणी सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.

गेल्या काही महिन्यांत मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुमसह अधिकृत ईमेल आयडीवर अज्ञात व्यक्तीकडून अशाच प्रकारे बॉम्बच्या धमकीचे मॅसेज पाठविले जात होते. अलीकडेच मुख्यमंत्री कार्यालयासह मुंबई-पुणे महापौर कार्यालय तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज कार्यालय उडविण्याची मेलमध्ये धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर या सर्व ठिकाणांची तपासणी करण्यात आली होती, मात्र तिथे काहीही आक्षेपार्ह सापडले नव्हते. या धमकीनंतर तेथील बंदोबस्तात प्रचंड वाढ करण्यात आली होती. या घटनेला काही दिवस उलटत नाहीतर तोवर शनिवारी साकळी साडेअकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशाच प्रकारचा एक मेल प्राप्त झाला होता.

अज्ञात व्यक्तीने ते एका दहशतवादी गटाचे सदस्य आहेत, त्यांनी आंतरराष्ट्रीय विमानतळावर बॉम्ब ठेवला आहे. या बॉम्बचा कुठल्याही क्षणी स्फोट होईल, त्यामुळे तुमच्याकडे वेळ कमी आहे. आम्ही अनेक ठिकाणी बॉम्ब ठेवले असून त्यापैकी एक बॉम्ब आंतराष्ट्रीय विमानतळावर ठेवला आहे. आम्ही कुठे आणि कधीही हल्ला करु शकतो, तुम्हाला लवकरच आमच्या दशहतीची खरी ताकद समजेल असे नमूद करण्यात आले होते. या धमकीच्या मेलनंतर विमानतळावरील सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली होती.

बॉम्बशोधक व नाशक पथकाने श्‍वान पथकाच्या मदतीने संपूर्ण विमानतळासह आसपासच्या परिसराची कसून तपासणी केली होती. मात्र तिथे पोलिसांना काहीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही. त्यामुळे बॉम्बची ती अफवा असल्याचे उघडकीस आले होते. या घटनेनंतर सहार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

प्राथमिक तपासात आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनस दोनवर हा मेल पाठविण्यात आला होता. बॉम्बची धमकी बोगस असली तरी विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. प्रत्येक प्रवाशांसह त्यांच्या सामानाची तपासणी केली जात आहे. कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून योग्य ती काळजी घेतली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page