हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरी करणारा गजाआड
नशेसह मैत्रिणीला खुश करण्यासाठी मोबाईल चोरी करत होता
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१७ जून २०२६
मुंबई, – जे. जे हॉस्पिटलमध्ये विविध उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचे मोबाईल चोरी करुन पळून जाणार्या एका सराईत आरोपीस जे. जे मार्ग पोलिसांनी अटक केली. सागर श्याम पारखे असे या २४ वर्षीय आरोपीचे नाव असून तो मानखुर्दचा रहिवाशी आहे. त्याच्या अटकेने मोबाईल चोरीच्या तीन गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून सात चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. नशेसह मैत्रिणीला खुश करण्यासाठी सागर हा मोबाईल चोरी करत असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे यांनी सांगितले. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असून त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्याच्या अटकेने अशाच इतर काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
जे. जे हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणाहून विविध आजारावर उपचार करण्यासाठी काही रुग्ण येतात. या रुग्णासोबत त्यांचे काही नातेवाईक राहत असल्याने ते नातेवाईक रात्रीच्या वेळेस वॉर्डबाहेरील मोकळ्या पॅसेजमध्ये झोपतात. त्याचाच फायदा घेऊन गेल्या काही दिवसांपासून अज्ञात व्यक्तीकडून अशा नातेवाईकांच्या मोबाईल चोरीचे सत्र सुरु होते. गेल्या आठवड्यात जे. जे हॉस्पिटलमधून दोन रुग्णांच्या नातेवाईकांचे दोन महागडे मोबाईल चोरीस गेले होते. याप्रकरणी दोन्ही तक्रारदारांनी जे. जे मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमोहीम सुरु असताना १४ जून ते १५ जूनला मध्यरात्री अशाच प्रकारे काही नातेवाईकांचे सात मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरी करुन पलायन केले होते. दोन दिवसांत सात मोबाईल चोरीच्या घटनेने हॉस्पिटलमधील रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तीन गुन्ह्यांत अज्ञात व्यक्तीने नऊ मोबाईल चोरी केले होते. मोबाईल चोरीच्या वाढत्या तक्रारीनंतर पोलीस उपायुक्त मनिष कलवानिया, सहाय्यक पोलीस आयुक्त तन्वीर शेख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख, पोलीस निरीक्षक मुकूंदा वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे, पोलीस हवालदार शिंदे, जाधव, पोलीस शिपाई बोडके, भोळे, काळे, धात्रक यांनी साध्या वेशात हॉस्पिटल परिसरात गस्त सुरु केली होती.
ही गस्त सुरु असताना रात्रीच्या वेळेस एक तरुण तिथे संशयास्पद फिरताना दिसून आला. त्याची हालचाल संशयास्पद वाटताच त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याचे नाव सागर पारखे असल्याचे उघडकीस आले. तो मानखुर्दच्या महाराष्ट्रनगर, माया चाळीत राहत असून बेरोजगार आहे. त्याला दारुसह ड्रग्जचे व्यसन आहे. त्याची एक मैत्रिण असून मौजमजेसह मैत्रिणीवर रुबाब दाखवून तिला खुश करण्यासाठी त्याला पैशांची गरज असल्याने तो मोबाईल चोरी करत असल्याचे तपासात उघडकीस आले. त्याच्याकडून तिन्ही गुन्ह्यांतील सात मोबाईल हस्तगत करण्यात आले असून उर्वरित दोन मोबाईल लवकरच हस्तगत केले जाणार असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे यांनी सांगितले.
सागर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मानखुर्द, ट्रॉम्बे आणि डोबिवली पोलीस ठाण्यात चोरीसह घरफोडीच्या पाच गुन्ह्यांची नोंद आहे. झटपट श्रीमंतीसह मैत्रिणीवर खर्च करण्यासाठी त्याने जे. जे हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या नातेवाईकाचे मोबाईल चोरीस सुरुवात केली होती. दोन प्रयत्नात त्याला यश आले होते. त्यानंतर तो १४ आणि १५ जूनला तिसर्यांदा जे. जे हॉस्पिटलमध्ये आला होता. यावेळी त्याने झोपेत असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांचे सात मोबाईल चोरी करुन पलायन केले होते. मंगळवारी तो पुन्हा चोरीसाठी आला, मात्र त्याचा प्रयत्न फसला आणि तो पकडला गेला. अटकेनंतर त्याला बुधवारी दुपारी लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.