एटीएममध्ये पाचशेच्या बोगस नोटा डिपॉझिट करणार्‍या खातेदाराला अटक

खातेदाराकडून पाच लाखांच्या पाचशे रुपयांच्या नोटा जप्त

0

अरुण सावरटकर
१८ जून २०२६
मुंबई, – दादरच्या एका नामांकित बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये पाचशे रुपयांच्या शंभर बोगस नोटा डिपॉझिट केल्याप्रकरणी मिलिंद मोहन बंदरकर या खातेदाराला दादर पोलिसांनी अटक केली. मिलिंदने कुर्ला येथून पाच लाख रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बोगस नोटा आणल्याची तसेच टप्याटप्याने एटीएम मशिनमध्ये डिपॉझिट करण्याची योजना बनविली होती, मात्र बँकेच्या अधिकार्‍यांच्या सतर्कमुळे त्याचा हा प्रयत्न फसला गेला आहे. त्याच्याकडून साडेचार लाख तर बँकेतून आलेले पन्नास हजार असे पाच लाखांच्या बोगस नोटा जप्त केल्या आहेत. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असल्याचे सांगण्यात आले.

दत्तात्रय क्रिष्णा तावले हे सायन येथे राहत असून सध्या ते एका नामांकित बँकेत म्हणून कामाला आहे. पूर्वी ते पुण्यातील चाकण शाखेत काम पाहत होते, मे २०२६ रोजी त्यांची प्रभादेवी येथील शाखेत ब्रॅच मॅनेजर म्हणून बदली झाली होती. १९ मेला सकज्ञाळी साडेदहा वाजता बँकेचे कर्मचारी वंदनाकुमारी आणि सिनिअर मॅनेजर पवनीत पुष्कर हे नेहमीप्रमाणे बँकेच्या एटीएममध्ये जमा झालेली कॅश काढण्यासाठी गेले होते. एटीएम मशिनमध्ये दोन कप्पे असून त्यातील एका कप्प्यात खर्‍या तर दुसर्‍या कप्प्यात बोगस नोटा असतात. या बोगस नोटा बँक अधिकारी जप्त करतात. त्या पुन्हा चलनात येऊ नये म्हणून याची योग्य ती काळजी घेतली जाते.

१९ मेला दुसर्‍या कप्प्यात ५०० रुपयांच्या शंभर नोटा डिपॉझिट झाले होते. त्यामुळे पन्नास हजार रुपयांच्या या बोगस नोटा बँक अधिकार्‍यांनी जप्त केल्या होत्या. पॉच सौ नंबर असलेल्या या नोटांवर महात्मा गांधींचे चित्र आणि मागील बाजूस लाल किल्ल्याचे चित्र दिसत होते. नोटांवर फॉर प्रोजेक्शन युज ऑनली, ३ सीबी ००००० असे लिहिलेले होते. या नोटा ताब्यात घेतल्यांनतर त्याची माहिती बँकेच्या पोर्टलवर भरुन ती माहिती त्यांच्या मुख्य कार्यालयात पाठविण्यात आली होती. बँकेच्या पोर्टलची तपासणी केल्यानंतर एका बँक खातेदाराने संबंधित बोगस नोटा डिपॉझिट केले होते. १८ मेला रात्री साडेनऊ ते पावणेदहाच्या सुमारास तो एटीएम सेंटरमध्ये आला होता. त्यानेच पाचशे रुपयांच्या संबंधित् बोगस शंभर नोटा डिपॉझिट केले होते.

या नोटा बोगस असल्याने त्या डिपॉझिट झाल्या नाही. त्यानंतर दत्तात्रय ताबले यांनी एटीएम सेंटरचे सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतले होते. या फुटेजवरुन संबंधित खातेदाराचे नाव मिलिंद बंदरकर असल्याचे उघडकीस आले. तो करीरोडच्या महादेव पालव मार्ग, महादेव निवास चाळीत राहत होता. या नोटा बोगस असल्याची माहिती असताना मिलिंदने त्या नोटा डिपॉझिट करण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे त्याच्याविरुद्ध बँकेच्या वतीने दत्तात्रय तावले यांनी दादर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मिलिंद बंदरकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होताच मिलिंद बंदरकरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्याने कुर्ला येथून पाच लाख रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बोगस विकत घेतल्याचे उघडकीस आले. या बोगस नोटा एटीएम मशिनमध्ये डिपॉझिट करुन बँकेची फसवणुक करण्याची त्याची योजना होती, टप्याटप्याने तो या नोटा एटीएममध्ये डिपॉझिट करणार होता. मात्र पहिल्याच प्रयत्नात त्याची योजना फसली गेली. त्याच्याकडून उर्वरित साडेचार लाख रुपयांच्या पाचशे रुपयांच्या बोगस नोटा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page