पोलीस असल्याची बतावणी करुन ज्वेलर्स व्यापार्याला लुटले
साडेबारा लाखांच्या कॅशसहीत सोन्याचे तुकडे घेऊन पलायन
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जून २०२६
मुंबई, – पोलीस असल्याची बतावणी करुन तीनजणांच्या एका टोळीने ज्वेलर्स व्यापार्याला लुटल्याची घटना जोगेश्वरी परिसरात उघडकीस आली आहे. त्यांच्याकडील साडेबारा लाखांची कॅश, सोन्याचे तुकडे असा तेरा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन या तिघांनी पलायन केले आहे. याप्रकरणी मेघवाडी पोलिसांनी पोलीस असल्याची बतावणी करुन खंडणीसह लुटमार केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेचे अधिकारी संमातर तपास करत आहेत.
ही घटना शनिवारी रात्री अकरा वाजता जोगेश्वरीतील प्रेमनगर, स्मिता बार, जनशक्ती पोलीस चौकीजवळ घडली. खोकन निताई मंडल हे ज्वेलर्स व्यापारी आहेत. जोगेश्वरी परिसरात त्यांच्या मालकीचे एक ज्वेलर्स शॉप आहे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन घरी जाण्यासाठी निघाले होते. यावेळी त्यांच्यकडे दुकानातील साडेबारा लाखांची कॅश आणि दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे तुकडे असा तेरा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल होता. रात्री अकरा वाजता ते स्मिता बार, जनशक्ती चौकीजवळून जात होते.
याच दरम्यान तिथे तीनजण आले. त्यांनी ते तिघेही गुन्हे शाखा युनिट दहाचे अधिकारी असल्याची बतावणी करुन त्यांना चौकशीसाठी त्यांच्यासोबत यावे लागेल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी त्यांना तिथे उभ्या असलेल्या हुंडाई कंपनीच्या ऑरा कारमध्ये बसविले. त्यानंतर ते सर्वजण कारमधून निघाले होते. कारमध्ये त्यांनी त्यांना पिस्तूलचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यांना धमकावून त्यांच्याकडील कॅश आणि सोन्याचे तुकडे असलेली बॅग घेऊन ते तिघेही पळून गेले. घडलेल्या प्रकाराने खोकन मंडल यांना प्रचंड धक्का बसला होता.
त्यांनी मेघवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगून तिन्ही तोतया पोलिसांविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी तिन्ही आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच फुटेजवरुन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. या घटनेची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत मेघवाडी पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेला तपासाचे आदेश दिले आहेत.