मोबाईल चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत सहा आरोपींना अटक
अटक आरोपींमध्ये चोरीचे मोबाईल घेणार्या चौघांचा समावेश
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२४ जून २०२६
मुंबई, – मोबाईल चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत सहा आरोपींना गावदेवी आणि सर जे. जे मार्ग पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली. अहमद जाफर शेख ऊर्फ अहमद पाया, मोहम्मद अली सय्यद, दानिश नयुम कुरेशी, आमीर रईस कुक्षरेशी, कासिब मकसूद खान आणि झाकीर खान अशी या सहाजणांची नावे आहेत. यातील अहमद आणि मोहम्मद अली हे रेकॉर्डवरील मोबाईल चोर असून इतर चार आरोपी चोरीचे मोबाईल विकत घेणारे असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचे साडेसात लाखांचे ४८ हून अधिक चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. त्यांच्या अटकेने मोबाईल चोरीच्या दहाहून अधिक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.
पहिल्या गुन्ह्यांतील तक्रारदार विलास जेठालाल छेडा असून त्यांच्या मालकीचे गावदेवी येथील भुलाभाई देसाई रोडवर एक मोबाईल शॉप आहे. १० जूनला त्यांच्या मोबाईल शॉपमधून तीन महागडे मोबाईल अज्ञात व्यक्तीने चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार नंतर उघडकीस येताच त्यांनी गावदेवी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी मोबाईल चोरीचा गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरु केला होता.
ही शोधमेाहीम सुरु असताना पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त मनोजकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त रागसुधा आर, सहाय्यक पोलीस आयुक्त सुमन चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय लोंढे, पोलीस निरीक्षक राजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप देसाई, पोलीस उपनिरीक्षक अनिकेत शेडगे, रणजीत चव्हाण, पोलीस हवालदार राजन परब, नरेंद्र कांबळे, रुपेश परब, शैलेश कदम, अभिजीत जाधव, पोलीस शिपाई दिपक करंबळकर, पूंजाराम गाडेकर, सावंत, जगदेश आदींनी मोहम्मद अली सय्यद याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले होते.
चौकशीत त्यानेच तिन्ही मोबाईल चोरी केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीच्या मोबाईलसह इतर गुन्ह्यांतील ४२ मोबाईल जप्त केले. या मोबाईलची किंमत सुमारे सव्वासात लाख रुपये इतकी आहे. मोहम्मद अली हा चोरीचे मोबाईल दानिश नयुम कुरेशी, आमीर रईस कुक्षरेशी, कासिब मकसूद खान आणि झाकीर खान यांना विक्री करत होता. त्यामुळे या चौघांनाही नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती.
दुसर्या कारवाईत सर जे जे मार्ग पोलिसांच्या पथकाने अहमद जाफर शेख ऊर्फ अहमद पाया या आरोपीस अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी सहा चोरीचे स्मार्टफोन जप्त केले आहेत. २० जूनला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रईस शेख यांच्या आदेशावरुन जे. जे मार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सैफन कुरणे, पोलीस हवालदार प्रितेश शिंदे, शशिकांत जाधव, पोलीस शिपाई भारत बोडके, संदीप भोळे, जगन काळे, अमोल धात्रक, सचिन पाटील आदींचे एक पथक परिसरात गस्त घालत होते. यावेळी दोनटाकी, चोरबाजार परिसरात खरेदीसाठी आलेल्या योगेंद्र रामनिहाल लोधी यांचा अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता.
हा प्रकार त्यांनी गस्त घालणार्या उपनिरीक्षक सैफन कुरणे यांना सांगितला असता पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना या पथकाने अहमद शेख याला संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेतले. तपासात तो सराईत मोबाईल चोर असल्याचे उघडकीस आले. त्याच्या अटकेने भोईवाडा, नागपाडा, एल. टी मार्ग, जे. जे मार्ग आणि पायधुनी पोलीस ठाण्यातील पाच मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. त्याच्याकडून गुन्ह्यांतील सहा मोबाईल पोलिसांनी जप्त केले आहेत. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते.