शाळेच्या प्रशासकीय अधिकार्याला खंडणीसाठी धमकाविणारे गजाआड
शाळेचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून २५ लाखांची मागणी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जून २०२६
ठाणे, – ठाण्यातील एका नामांकित शाळेच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्याकडे खंडणीची मागणी करणार्या दोन आरोपींना ठाण्याच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. प्रमोद चंद्रकांत परदेशी ऊर्फ राजवीर राजपूत आणि नारायण ओमप्रकाश शर्मा अशी या दोघांची नावे आहेत. खंडणीच्या याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या सोमवार २९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या दोघांवर शाळेचे बांधकाम अनधिकृत असल्याचे सांगून त्याची पालिकेत तक्रार करुन संंबंधित बांधकाम तोडण्याची तसेच तक्रार अर्ज करु नये म्हणून तक्रारदाराकडे २५ लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. या दोघांची सध्या पोलिसांकडून चौकशी सुरु असून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांना खंडणीसाठी धमकी दिली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
ठाण्यातील घोडबंदर रोड, मानपाडा परिसरात सेंट झेव्हीअर्स हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज आहे. या शाळा-कॉलेजमध्ये बिरबल गोविंद बंडगर हे प्रशासकीय अधिकारी म्हणून काम पाहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे राजवीर राजपूत आणि नारायण शर्मा हे दोघेही आले होते. या दोघांनी त्यांच्या शाळेचे बांधकाम अनधिकृत आहे. त्यामुळे या बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालिकेत तक्रार करुन ते बांधकाम तोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते. त्यांनी तक्रार अर्ज करु नये तसेच शाळेचे बांधकाम तोडण्यात येऊ नये म्हणून त्यांच्याकडे २५ लाखांच्या खंडणीची मागणी केली होती.
मात्र ही जास्त असल्याने त्यांनी त्यांना पंधरा लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. ही रक्कम देण्याची तयारी दर्शवून त्यांनी राजवीर राजपूत आणि नारायण शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहपोलीस आयुक्त पंजाबराव उगले, पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी गंभीर दखल घेत खंडणीविरोधी पथकाला तपासाचे आदेश दिले होते. या आदेशानंतर पोलिसांनी बिरबल बंडगर यांना खंडणीची रक्कम घेण्यासाठी दोन्ही आरोपींना ठाण्यातील पाचपाखडी, रवी कंपाऊंड, श्रीपाल कॉम्प्लेक्स येथे बोलविण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणे गुरुवारी तिथे खंडणीची रक्कम घेण्यासाठी राजवीर राजपूत आणि नारायण शर्मा हे दोघेही आले होते. यावेळी या दोघांनाही पंधरा लाखांची खंडणीची रक्कम घेताना सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस, पोलीस उपनिरीक्षक सुभाष तावडे, पोलीस हवालदार राठोड, शैलेश शिंदे, राजाराम पाटील, पोलीस नाईक सुमीत मथाळे, पोलीस शिपाई अरविंद शेजवळ, महिला पोलीस शिपाई मयुरी भोसले, पोलीस हवालदार चालक हिवरे आदी पोलीस पथकाने सापळा लावून रंगेहाथ पकडले.
त्यांच्याविरुद्ध खंडणीसाठी धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर दोन्ही आरोपींना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना सोमवार २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील राजवीर राजपूत हा ठाण्यातील नौपाडा परिसरात राहत असून जाहिरात होल्डींग तयार करण्याचे काम करतो तर नारायण शर्मा हा ठायातील श्रीनगर, महाराष्ट्र बॅकेजवळ राहत असून खाजगी नोकरी करतो. या दोघांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांना खंडणीसाठी धमकी दिली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.