मित्राच्या हत्येत २१ वर्षांपासून वॉण्टेड असलेल्या आरोपीस अटक

पत्नीवर लैगिंक अत्याचार करणार्‍याला मदत केल्याच्या रागातून हत्या

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२६ जून २०२६
मिरा-भाईंदर-वसई-विरार, – विरार येथे राहणार्‍या दिलीप तुकाराम चव्हाण या ३० वर्षांच्या तरुणाची हत्या करुन हत्येचा पुरावा नष्ट करुन पळून गेलेल्या एका आरोपीस वसई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी उत्तरप्रदेशातून अटक केली. राजेश सुरेश सोनकर असे या ४१ वर्षांच्या आरोपीचे नाव असून हत्येचा गुन्हा दाखल होताच तो पळून गेला होता. अखेर २१ वर्षांनी त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पत्नीवर लैगिंक अत्याचार करणार्‍या आरोपीला मदत केल्याचा संशयावरुन राजेशने दिलीप चव्हाणची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तो सध्या पोलीस कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

रत्नाकर शंकर चव्हाण हे वसईतील किल्ला रोड, अर्नाळा बंदरपाडा परिसरात राहतात. त्यांचा दिलीप हा चुलत भाऊ आहे. २००५ साली त्याची अज्ञात व्यक्तीने डोक्यात जड वस्तूने मारहाण करुन हत्या केली होती. या हत्येनंतर मारेकर्‍याने मृतदेहाची विल्हेवाट लावून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी भाटीबंदर ते चिखल डोंगराकडे जाणार्‍या बंधार्‍याच्या खाडी किनार्‍यावर त्याचा मृतदेह विरार पोलिसांना सापडला होता. या घटनेनंतर २७ डिसेंबर २००५ रोजी विरार पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध हत्येसह हत्येचा पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती.

याच गुन्ह्यांत राजेश सोनकर याचा सहभाग उघडकीस आला होता. मात्र हत्येनंतर तो विरार येथून पळून गेला होता. त्याच्या अटकेसाठी एक टिम उत्तरप्रदेशासह इतर राज्यात गेली होती, मात्र तो प्रत्येक वेळेस पोलिसांना गुंगारा देत होता. गेल्या २१ वर्षांपासून त्याचा पोलिसांकडून शोध सुरु होता. ही शोधमेाहीम सुरु असताना तो त्याच्या उत्तरप्रदेशातील गावी असल्याची माहिती वसई गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांना प्राप्त झाली होती. या माहितीनंतर गुन्हे शाखेची एक टिम उत्तरप्रदेशला रवाना झाली होती. या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने राजेश सोनकर याला त्याच्या राहत्या गावाहून ताब्यात घेतले होते.

चौकशीत त्यानेच दिलीप चव्हाण याची हत्या करुन त्याचा हत्येचा पुरावा नष्ट केल्याची कबुली दिली. तपासात राजेश हा मूळचा उत्तरप्रदेशच्या प्रयागराज, पुरामुप्ती कोसंबीच्या तळोंगज मनोरीचा रहिवाशी आहे. मृत दिलीप आणि राजेश हे दोघेही चांगले मित्र होते. अर्नाळा येथील अर्नाळा हिंदू हॉटेलमध्ये साफसफाईचे काम करायचे. याच दरम्यान राजेशच्या पत्नीवर दिलीपच्या एका परिचित व्यक्तीने लैगिंक अत्याचार केला होता. याकामी या व्यक्तीला दिलीपने मदत केल्याचा त्याला संशय होता. त्यामुळे त्याच्या मनात दिलीपविषयी प्रचंड चीड होती. याच रागातून त्याने त्याची हत्या केली होती. त्याचा पुरावा नष्ट करुन तो पळून गेला होता.

हत्येनंतर तो विरार येथून उत्तरप्रदेशच्या लखनऊ शहरात गेला. तिथे सहा वर्ष राहिल्यानंतर तो प्रयागराज येथे आला होता. गेल्या पंधरा वर्षांपासून तो तिथे स्वतचे अस्तित्व बदलून राहत होता. ई-रिक्षा चालवून स्वतचा उदरनिर्वाह चालवत होता. या घटनेला २१ वर्ष झाली असून आता पोलीस त्याला कधीच पकडणार नाही असे त्याला वाटत होते, मात्र २१ वर्षांनंतर त्याला अटक करण्यात पोलिसांना यश आले. अटकेनंतर त्याला पुढील कारवाईसाठी विरार येथे आणण्यात आले. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अतिरिक्त पोलीस आयुक्त संजय शिंत्रे, पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक संतोष घाडगे, अजीत गिते, सहाय्यक फौजदार संजय नवले, रविंद्र पवार, मुकेश पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, प्रफुल्ल पाटील, जगदीश गोवारी, दादा आडके, पोलीस अंमलदार अनिल साबळे, अक्षय बांगर, मसुब रामेश्‍वर केकान, सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page