पत्नी सोडून गेली म्हणून जगाचा सूड घेण्यासाठी केले कृत्य
कोठडीत फैयाज प्रेमजीकडून आणखीन धक्कादायक खुलासे होणार
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२८ जून २०२६
मुंबई, – दोन वर्षापूर्वी पत्नी सोडून गेली, संपूर्ण जग आपल्या विरोधात असल्याचे समजून या जगाला संपविण्याच्या उद्देशाने फैयाज प्रेमजीने मोहरमच्या मिरवणुकीत उंदराचे विष म्हणून जाणार्या झिंक फॉस्फाइडमिश्रीत गोळ्या वाटप करुन आपला सूड घेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा पोलीस तपासात उघडकीस आला आहे. त्याने दिलेल्या गोळ्या मिरवणुकीत सामिल झालेल्या लोकांनी घेतल्या तर मोठी जिवीतहानी झाली असती, मात्र पोलिसांनी वेळीच फैयाजला अटक करुन पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जाते. अटकेनंतर त्याला लोकल कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
फैयाज प्रेमजी हा मूळचा पुण्याच्या विमाननगरचा रहिवाशी असून तिथेच तो त्याच्या वडिलांसोबत राहतो. ते दोघेही रंगाच्या एका कारखान्यांत कामाला आहेत. त्याची आई आणि बहिण सध्या इराण येथे राहत असून बहिण डॉक्टर आहे. २०२५ रोजी तो इराणला त्यांना भेटण्यासाठी गेला होता, तेथून तो इराकला गेला होता. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तो पुण्यातून मुंबईत आला होता. मुंबईतील डोंगरी परिसरातील एका गेस्ट हाऊसमध्ये तो वास्तव्यास होता. शुक्रवारी मोहरम असल्याने भायखळा परिसरारत एका मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत अडीच ते तीन लाख लोक सामिल झाले होते. मिरवणुक सामिल झालेल्या लोकांसाठी पाण्यासह इतर खाण्याची सोय करण्यात आली होती. याच मिरवणुकीत फैयाज हा लोकांना झिंक फॉस्फाईडमिश्रीत गोळ्या वेदनाशामक म्हणून देत होता. त्याने एकज्ञा बुरखाधारी महिलेसह गोवंडीतून मिरवणुकीसाठी आलेल्या सलमान सय्यदला दिले होते.
सलमानने ती गोळी घेतली होती, घरी गेल्यानंतर त्याला त्रास होऊ लागला. गोळी खाल्यानंतर हा त्रास होत असल्याचे लक्षात येताच त्याच्या नातेवाईकांनी त्यांच्या परिचितांसह मिरवणुकीत सामिल झालेल्यांना दिली होती. सलमानला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती प्राप्त होताच भायखळा पोलीस ऍक्शन मोडमध्ये आली होती. मिरवणुक एका व्यक्तीकडून संबंधित गोळ्यांचे वाटप होत असल्याची माहिती प्राप्त होताच पोलिसांनी आरोपीचा शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी फैयाज प्रेमजीला ताब्यात घेतले होते. चौकशीत तो पुण्याचा रहिवाशी असल्याचे, मोहरम मिरवणुकीसाठी मुंबईत आल्याचे उघडकीस आले. त्याच्या डोंगरीतील गेस्ट रुममध्ये छापा टाकल्यानंतर पोलिसांना तिथे १४ हजार ९०० कॅप्सुल सापडल्या.
तपासात या गोळ्या झिंक फॉस्फाईटमिश्रीत होत्या. त्यात शरीरात गेल्यानंतर ते पोटातील आम्लांशी अभिक्रिया करते. त्यातून फॉस्फिन वायू बाहेर येऊन रक्तप्रवाहात मिसळतो. त्यामुळे शरीरातील पेंशींना ऑक्सिजन न मिळाल्यास त्रास होतो. काही अवयव निकामी होण्याची शक्यता असते. हा प्रकार उघडकीस येताच त्याच्याविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे, विष आदींच्या माध्यमातून दुखापत करणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्याला लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तपासात फैयाजने ऑनलाईन ५० किलो झिंक फॉस्फाइड मागविले होते. याच गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्यास असताना त्याने प्रत्येक कॅप्सुलमध्ये एक ग्रॅम झिंक फॉस्फाईड भरले होते. ते सर्वज साहित्य पोलिसांनी जप्त करुन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे. दोन वर्षांपासून तो त्याच्या पत्नीपासून विभक्त राहत होता. तेव्हापासून त्याची मानसिक स्थिती ठिक नव्हती. त्याला संपूर्ण जग त्याच्या विरोधात गेल्याचे वाटत होते. त्यामुळे त्याला या जगाचा सूड घ्यायचा होता. त्यातून त्याच्याकडून हा प्रकार घडल्याचे तपासात उघडकी आले.
त्याच्यावर मानसोपचार सुरु होते याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. तो त्याच्या वडिलांसोबत राहत होता, त्यामुळे त्याच्या वडिलांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. त्यांची पोलिसांकडून जबानी नोंदविण्यात येणार आहे. तसेच त्याच्या आईसह बहिणीला पोलिसांकडून संपर्क साधून चौकशीसाठी हजर राहण्याची विनंती केली जाणार आहे. या गुन्ह्यांत त्याला इतर कोणी मदत केली का, या कटाची इतर कोणाला माहिती होती का, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का याचाही पोलिसांकडून तपास सुरु आहे.