व्हॉटअप डिपीवर मालकाचा फोटो ठेवून साडेदहा कोटीची फसवणुक
विविध राज्यातून सहाजणांना अटक तर ५.६३ कोटीची रक्कम फ्रिज
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जून २०२६
मुंबई, – व्हॉटअप डिपीवर मालकाचा फोटो ठेवून सुमारे साडेदहा कोटीची फसवणुक करणार्या एका आंतरराज्य सायबर टोळीचा दक्षिण प्रादेशिक विभागाच्या सायबर सेल पोलिसांनी पर्दाफाश केला. याप्रकरणी महाराष्ट्र, दिल्ली, बिहार राज्यातून सहाजणांना अटक केली आहे. ज्ञानेश्वर दरेभान ठोके, बिरेंद्रकुमार चंद्रमा भगत, रंजनकुमार राजू खरवार, विकास उपेंद्र बिंद, वंश सुमीत मनोचा आणि फैयाज शब्बीर हुसैन आलम अशी या सहाजणांची नावे आहेत. या आरोपींकडून पोलिसांनी दोन मोबाईल, बँकेचे पासबुक आणि एटीएम कार्ड जप्त केले आहेत. फसवणुकीच्या रक्कमेतून आरोपींनी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
यामील तक्रारदार एका नामांकित कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. ३ जूनला त्यांच्या मोबाईलवर कंपनीच्या संचालकांचा फोटो असलेला व्हॉटअपवरुन एक मॅसेज आला होता. त्यात त्याने तो कंपनीचा संचालक असून एका मिटींगमध्ये व्यस्त आहे. त्याला तातडीने पैशांची गरज आहे. त्यामुळे कंपनीच्या बँक खात्यातून संबंधित बँक खात्यात पैसे पाठविण्याचे आदेश देण्यात आले होते. या मॅसेजची कुठलीही शहानिशा न करता तक्रारदारांनी ३ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत विविध बँक खात्यात १० कोटी ४० लाख ७१ हजार ९२४ रुपये ट्रान्स्फर केले होते. याच दरम्यान त्यांनी कंपनीच्या संचालकांना कॉल करुन पैसे मिळाले की नाही याबाबत विचारणा केली होती, यावेळी त्यांनी त्याला कुठलाही मॅसेज पाठविला नाही, पैसे पाठविण्यासाठी बॅक खात्याचा तपशील दिला नसल्याचे उघडकीस आले.
फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच तक्रारदारांनी दक्षिण सायबर सेल पोलिसांना घडलेला प्रकार सांगून अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी ज्या बँक खात्यात ही रक्कम पाठविण्यात आली होती, त्या सर्व बँक खात्याची माहिती काढून फसवणुकीच्या रक्कमेपैकी ५ कोटी ६३ लाख ९८ हजार १९१ रुपये बँक खात्यात फ्रिज केली होती. तपासात फसवणुकीच्या रक्कमेचे धागेदोरे महाराष्ट्र, बिहार, उत्तरप्रदेश आणि दिल्ली येथे मिळूल आले होते. त्यानंतर या पथकाने आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती.
ही शोधमोहीम सुरु असताना पोलिसांनी ज्ञानेश्वर ठोके याला जालन्या तिर्थपुरी येथून ताब्यात घेतले. त्याच्या बँक खात्यात सुमारे ३१ लाख रुपये जमा झाले होते. त्याने एका बँकेत खाते उघडून बँकेचे डेबीट कार्ड, चेकबुक, पासबुक आणि सिमकार्ड गुन्ह्यांतील मुख्य आरोपींना दिले होते. फसवणुकीची साडेनऊ लाखांची रक्कम बिरेंद्रकुमारच्या बँक खात्यात जमा झाली होती, त्यामुळे त्याला बिहारच्या सिवान येथून पोलिसांनी अटक केली. त्याने रंजनकुमार याला त्याचे बँक खाते वापरण्यासाठी दिले होते, त्यामुळे रंजनकुमारला नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याने फसवणुकीच्या रक्कमेतून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने खरेदी केले होते. ते दागिने त्याने मुख्य आरोपींना दिले होते.
याकामी आरोपींना विकास बिंद, वशं मनोचा आणि फैयाज आलम यांनी मदत केली होती. ते तिघेही तिहार जेलमध्ये असल्याने त्यांचा नंतर पोलिसांनी ताबा घेतला होता. या सर्वांना नंतर पुढील तपासकामी मुंबईत आणण्यात आले होते. या गुन्ह्यांत सहाही आरोपींचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली होती. अटकेनंतर त्यांना गिरगाव येथील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील मुख्य आरोपी अद्याप फरार असून त्यांच्या अटकेसाठी सायबर सेलची एक टिम उत्तरप्रदेश आणि बिहारला पाठविण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलस आयुक्त अनिल कुुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे, सहाय्यक पोलीस आयुक्त इरफान शेख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, पोलीस निरीक्षक सुरेश भोये, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन त्रिमुखे, ईशान खरोटे, रामदास गोपाळ, पोलीस उपनिरीक्षक शिंपदे, पोलीस हवालदार गलांडे, प्रताप जाधव, शिंदे, सहाय्यक फौजदार उत्तेकर, खान, महिला पोलीस शिपाई रेश्मा धुमाळ, महिला हवालदार जयश्री बडबे या पथकाने केली.