इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना अटक
दोन विदेशी पिस्तूल, मॅगझीन, ५० जिवंत राऊंड जप्त
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
३० जून २०२६
मुंबई, – इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांसह दोघांना गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. रणजीत सिंग आणि अमृतपाल सिंग अशी या दोघांची नावे असून ते दोघेही पंजाबचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून पोलिसांनी दोन पिस्तूल, मॅगझीन आणि पन्नास राऊंड जप्त केले आहेत. घातक शस्त्रे बाळगून या शस्त्रांची विक्री केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आली असून याच गुन्ह्यांत दोन्ही आरोपींना किल्ला कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही वर्षांत इतर राज्यातून घातक शस्त्रे आणून या शस्त्रांची मुंबई शहरात विक्री होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली होती. त्यामुळे अशा शस्त्राची तस्करी करणार्या आरोपीविरुद्ध मुंबई पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना पी डिमेलो रोड, वाडीबंदर बसस्टॉपजवळील कल्याण स्ट्रिट परिसरात काहीजण इतर राज्यातून आणलेल्या घातक शस्त्रांची विक्रीसाठी येणार असल्याची माहिती खंडणीविरोधी पथकाला मिळाली होती.
या माहितीनंतर पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त राजतिलक रौशन, सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक संजय तरळगट्टी, पोलीस निरीक्षक सुनिल पवार, अरुण थोरात, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल मोहिते, रुपेश पाटील, पोलीस हवालदार महेश मुळे, प्रमोद शिर्के, कैलास चौगुले, अमोल तोडकर, महेश धादवड, पोलीस शिपाई कैलास जाधव, जगदीश कोळी, विशेष कार्य पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमर धोत्रे, पोलीस हवालदार मनोज नार्वेकर, सोमनाथ दगडे,आतिश थोरात, उत्कृष्ठ कदम, संतोष बेरड यांनी तिथे साध्या वेशात पाळत ठेवली होती.
सकाळी सहा वाजता तिथे दोन तरुण आले होते, या दोघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीसह सामानाची तपासणी केल्यानंतर त्यात पोलिसांना दोन विदेशी बनावटीचे पिस्तूल मॅगझीनसह, पन्नास राऊंड सापडले. तपासात ते दोघेही घातक शस्त्रांची विक्रीसाठी तिथे आले होते, मात्र शस्त्रांची विक्री करण्यापूर्वीच या दोघांना पोलिसांनी अटक केली. ते दोघेही पंजाबचे रहिवाशी असून पंजाब येथून ते घातक शस्त्रे घेऊन आले होते.
यातील एका आरोपीविरुद्ध अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. अटकेनंतर त्यांना मंगळवारी दुपारी किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांना ते घातक शस्त्रे कोणी दिले, ते कोणाला देण्यासाठी मुंबईत आले होते, या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला का किंवा होणार होता का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.