बोगस कॉल सेंटरद्वारे नोकरीचे आमिष दाखविणार्‍या टोळीचा पर्दाफाश

उत्तरराखंड येथील कॉल सेंटरमध्ये कारवाई करुन अकराजणांना अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जुलै २०२६
मुंबई, – बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीचे आमिष दाखवून अनेक बेरोजगार तरुणांची फसवणुक करणार्‍या एका टोळीचा मानखुर्द पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी उत्तरखंडच्या एका कॉल सेंटरमध्ये पोलिसांनी कारवाई करुन अकराजणांना अटक केली. ते सर्वजण उत्तरप्रदेश, गुजरात आणि नागालँडचे रहिवाशी असून त्यांच्याकडून पोलिसांनी नऊ लॅपटॉप, तेरा मोबाईलसह इतर मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटकेनंतर त्यांना लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या कटातील मुख्य आरोपी कारवाईनंतर पळून गेल्याने त्यांचा पोलिसांकडून शोध सुरु आहे. या टोळीकडून फसवणुक झालेल्या लोकांनी मानखुर्द पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

ज्योती रमेश राऊत ही तरुणी मानखुर्द परिसरात राहत असून तिचे बी कॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. तिच्या वडिलांचा लहान मुलांचे खेळणे विक्रीचा व्यवसाय आहे. पदवीपर्यंत शिक्षण झाल्याने ती नोकरीच्या शोधात होती. त्यासाठी तिने एका ऑनलाईन जॉंब पोर्टलवर स्वतची माहितीसह प्रोफाईल अपलोड केली होती. २४ जानेवारी २०२६ रोजी तिला एका अज्ञात व्यक्तीने कॉल करुन त्याचे नाव विहान मेहरा असल्याचे सांगितले होते. तो एअरपोर्ट ऍथोरिटी ऑफ इंडियाचा एचआर असून एअरपोर्टमध्ये मोठ्या प्रमाणात नोकरी भरती होणार आहे. तिला आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोकरीची ऑफर देऊन त्याने तिच्याकडे तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड, राहण्याचा कायमचा पत्ता तसेच शैक्षणिक प्रमाणपत्रांची मागणी केली.

काही दिवसांनी त्याने तिच्याकडे इंटरव्हूसह मेडीकल चेकअप, आवश्यक किट आणि इतर कामासाठी पैशांची मागणी करुन तिला एका बँक खात्याची माहिती पाठविण्यात आली होती. त्याच्यावर विश्‍वास ठेवून तिने संबंधित बँक खात्यात टप्याटप्याने २ लाख ५८ हजार ४२० रुपये ट्रान्स्फर केले होते. मात्र एक ते दिड महिना उलटूनही त्याने तिला नोकरी दिली नाही. कॉल केल्यानंतर तो तिला प्रतिसाद देत नव्हता. फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच तिने मानखुर्द पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित आरोपीविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह आयटी कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या तक्रारीची अतिरिक्त पोलीस आयुक्त धनंजय कुलकर्णी, पोलीस उपायुक्त समीर शेख यांनी गंभीर दखल घेत मानखुर्द पोलिसांना तपासाचे आदेश दिले होते.

या आदेशानंतर आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिलाल अहमद अमरुद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हणमंत ओऊळकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस उपनिरीक्षक मोटे, पोलीस हवालदार जवळ, दरेकर, जयेश पाटील, पोलीस शिपाई घोरपडे, महेश काटकर, डमाळे, महिला पोलीस शिपाई सुनिता पवार, मसुब हुबळे आदींचे एक विशेष पथक नियुक्त करण्यात आले होते. या गुन्ह्यांचा तपास करताना अशा प्रकारे फसवणुक करणारी ही एक सराईत टोळी असल्याचे उघडकीस आले. उत्तराखंड येथून या टोळीतील सदस्यांना अनेकानंा नोकरीसाठी कॉल केले होते, त्यांच्याकडून त्यांचे वैयक्तिक तसेच शैक्षणिक कागदपत्रांची मागणी करुन नंतर त्यांच्याकडून प्रोसेसिंग फीसह इतर कामासाठी पैसे घेतले होते.

तपासात आलेल्या या माहितीनंतर या पथकाने उत्तराखंड येथील डेहरादूर शहरात कार्यरत असलेल्या एका कॉल सेंटरमध्ये छापा टाकला होता. या छाप्यादरम्यान पोलिसांनी अकराजणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत त्यांनीच बोगस कॉल सेंटर सुरु करुन अनेकांना नोकरीसाठी कॉल केल्याची कबुली दिली. काहींना नोकरीचे बोगस नियुक्तीपत्र पाठवून त्यांची फसवणुक केली होती. या कारवाईत पोलिसांनी नऊ लॅपटॉपसह तेरा मोबाईल फोन तसेच इतर दस्तावेज जप्त केले आहे. तपासात आलेल्या या माहितीनंतर या अकराजणांना पोलिसांनी अटक केली.

ट्रॉन्झिंट रिमांड घेतल्यानंतर या सर्वांना पुढील कारवाईसाठी मुंबईत आणण्यात आले होते. या गुन्ह्यांत अटकेची कारवाई केल्यानंतर त्यांना लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु असून या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या गुन्ह्यांतील मुख्य आरोपी फरार असल्याने त्यांच्या अटकेसाठी आता पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page