हॉस्पिटलमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणुक
फसवणुकीप्रकरणी चुलत भावासह दोघांना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जुलै २०२६
मुंबई, – हॉस्पिटलमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाची सुमारे ४८ लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी दोघांना कस्तुरबा मार्ग पोलिसांनी अटक केली. अब्दुल हमीद अख्तर हुसैन पेपरवाला आणि हुसैन अहमद सिद्धीकी अशी या दोघांची नावे असून यातील अब्दुल हा तक्रारदार व्यावसायिकाचा चुलत भाऊ आहे. अटकेनंतर या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यंत नफिस मसुर सिद्धीकी आणि नजमा सिद्धीकी यांचा सहभाग उघडकीस आला असून त्यांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले आहे. त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे.
५२ वर्षांचे तक्रारदार व्यावसायिक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत बोरिवली परिसरात राहतात. अब्दुल पेपरवाला हा त्यांचा चुलत भाऊ आहे. गेल्या वर्षी जून महिन्यांत तो डॉ. हुसैनसह इतर दोघांसोबत त्यांच्या घरी आला होता. यावेळी त्याने हुसैन आणि नजमा हे दोघेही स्वतचे हॉस्पिटल सुरु करत आहे. त्यात त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलसाठी आर्थिक मदत करुन गुंतवणुक करण्याची विनंती केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. इतकेच नव्हे तर त्यांचा विश्वास बसावा म्हणून एका खाजगी बँकेचे तीन कोटी रुपयांचे बोगस मंजुरी पत्र दाखवून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा चुलत भाऊ अब्दुल पेपरवाला याने त्यांची शिफारस केली होती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गुंतवणुकीचा निर्णय घेतला होता.
जून २०२५ ते जून २०२६ या कालावधीत त्यांनी त्यांना टप्याटप्याने ४३ लाख बँक ट्रान्स्फरद्वारे तर पाच लाख रुपये कॅश स्वरुपात असे ४८ लाख रुपये दिले होते. याबाबत त्यांच्यात एक करार झाला होता. मात्र त्यांनी त्यांच्याकडून झालेल्या गुंतवणुकीवर कुठलाही परतावा दिला नाही. विचारणा केल्यानंतर ते चौघेही त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत होते. या चौघांनी फसवणुकीच्या उद्देशाने त्यांच्या हॉस्पिटलमध्ये गुंतवणुक केल्यास चांगल्या परताव्याचे आमिष दाखविले होते. फसवणुकीचा हा प्रकार लक्षात येताच त्यांनी त्यांच्या चुलत भावासह इतर तिघांविरुद्ध कस्तुरबा मार्ग पोलिसांत तक्रार केली होती.
या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर अब्दुल पेपरवाला, नफिस सिद्धीकी, डॉ. हुसैन सिद्धीकी आणि नजमा सिद्धीकी या चारही आरोपीविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच अब्दुल हुसैन आणि हुसैन सिद्धीकी या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या गुन्ह्यांत त्यांचा सहभाग उघडकीस येताच त्यांच्यावर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.