फसवणुकीच्या अन्य एका गुन्ह्यांत बिल्डर पिता-पूत्राला अटक
फ्लॅटसाठी घेतलेल्या २६ लाखांचा अपहार केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जुलै २०२६
मुंबई, – फसवणुकीच्या अन्य एका गुन्ह्यांत बिल्डर पिता-पूत्राला बोरिवली पोलिसांनी अटक केली. अशोक अरविंदभाई जेठवा आणि मिहीर अशोक जेठवा अशी या दोघांची नावे आहेत. त्यांच्यावर फ्लॅट घेतलेल्या सुमारे २६ लाखांचा अपहार करुन एका सीएची फसवणुक केल्याचा आरोप आहे. फसवणुकीच्या याच गुन्ह्यांत या दोघांनाही बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. जेठवा पिता-पूत्र रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध अशाच प्रकारच्या अकराहून अधिक अपहारासह फसवणुकीच्या गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या अटकेनंतर इतर काही तक्रारदार फसवणुकीची तक्रार करण्यासाठी पुढे येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
प्रसाद पंढरीनाथ चित्रे हे व्यवसायाने सीए असून नालासोपारा परिसरात राहतात. २०१७ साली ते त्यांच्या पतीसह मुलीचे पुढील शिक्षण मुंबईत घेण्याचा तसेच त्यासाठी मुंबईत एका फ्लॅटमध्ये गुंतवणुकीचा विचार करत होते. त्यांना बोरिवलीमध्ये त्यांच्या बजेटमध्ये एका फ्लॅटची गरज होती. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु होते. याच दरम्यान त्यांना बोरिवलीतील निलआकाश सोसायटीच्या इमारतीच्या प्रोजेक्टविषयी माहिती समजली होती. अकरा मजल्याच्या या इमारतीचे बांधकाम जेठवा पिता-पूत्राच्या त्रिवेणी डेव्हल्पर कंपनीकडून सुरु होते. त्यामुळे त्यांनी अशोक व त्यांचा मुलगा मिहीर जेठवा यांची भेट घेतली होती.
या दोघांनी त्यांना सातव्या मजल्यावर ७०१ क्रमांक फ्लॅट देण्याचे आश्वासन दिले होते. या फ्लॅटची किंमत ८० लाख रुपये इतकी होती. त्यासाठी त्यांना काही रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्यांना २६ लाख २६ हजार रुपयांचे पेमेंट केले होते. या पेमेंटनंतर त्यांना फ्लॅटचे रजिस्ट्रेशनचे लवकरच करण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी फ्लॅटचे रजिस्ट्रेशन केले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी जेठवा पिता-पूत्राविरुद्ध महारेरामध्ये तक्रार केली होती. या तक्रारीवरुन सुनावणी देताना महारेराने त्यांना फ्लॅटमध्ये गुंतवणुक केलेली रक्कम व्याजासहीत परत करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांनी त्यांचे पैसे परत केले नाही.
जेठवा पिता-पूत्राकडून फसवणुक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर या दोघांविरुद्ध एप्रिल महिन्यांत पोलिसांनी फ्लॅटसाठी घेतलेल्या २६ लाखांचा अपहार करुन फसवणुक, महाराष्ट्र मालकी फ्लॅट अधिनियमच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत वॉण्टेड असलेल्या अशोक जेठवा आणि मिहीर जेठवा या दोघांनाही पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. तपासात जेठवा पिता-पूत्र हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध कस्तुरबा मार्ग, बोरिवली, एमएचबी पोलीस ठाण्यात फ्लॅट फसवणुकीच्या अकराहून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.