कौटुंबिक वादातून माहेरी गेलेल्या पत्नीवर चाकूने हल्ला

हत्येचा गुन्हा दाखल होताच आरोपी पतीला अटक

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जुलै २०२६
मुंबई, – कौटुंबिक वादातून माहेरी गेलेली पत्नी सासरी येत नाही म्हणून झालेल्या वादातून पत्नीच्या गळ्यावर पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना दहिसर परिसरात घडली. या हल्ल्यात निकिता दिनेश जाधव ही २२ वर्षांची महिला गंभीररीत्या जखमी झाली असून तिच्यावर कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. याप्रकरणी हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपी पतीला तीन दिवसांपूर्वी दहिसर पोलिसांनी अटक केली. दिनेश मधुकर जाधव असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही घटना मंगळवारी २३ जूनला सकाळी अकरा वाजता दहिसर येथील संत कबीर रोडवरील कोकणीपाडा, कैलासनगरातील शिवशक्ती चाळीत घडली. निकिती ही पनवेलच्या विंचुबे गाव, तुळशीगार्डन अपार्टमेंटमध्ये राहत असून आरोपी दिनेश हा तिचा पती आहे. चार वर्षांपूर्वी तिचा दिनेशसोबत प्रेमविवाह झाला होता. कॉलेजमध्ये शिकत असताना ती दिनेशला ओळखत होती. त्यातून त्यांची ओळख आणि नंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले होते. त्यानंतर दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने त्यांनी विवाह केला होता. दिनेश हा काहीच कामधंदा करत नसून तो सतत आजारी पडत होता. अनेकदा तिच्यामुळेच तो आजार पडतो असे बोलून दाखवत होता. त्यातून त्यांच्यात अनेकदा खटके उडत होते. याच कारणावरुन तो तिला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होता.

प्रेमविवाह केल्यामुळे ती तिच्या आई आणि भावाला काही सांगत नव्हती. गेल्या काही दिवसांत दिनेशच्या स्वभावात प्रचंड बदल झाला होता. तिला मोबाईल तपासून तो तिच्यावर संशय घेत होता. दिनेशेकडून होणार्‍या सततच्या होणार्‍या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळून ती तिच्या दहिसर येथे माहेरी निघून आली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून ती तिच्या आईसोबत राहत होती. यावेळी दिनेश तिला कॉल करुन घरी येण्यास तसेच तिला पुन्हा त्रास देणार नाही असे सांगत होता. मात्र तिने पुन्हा सासरी येण्यास नकार दिला होता. तसेच त्याच्यासोबत राहण्याची इच्छा नसल्याने तिने त्याला स्पष्टपणे बोलून दाखविली होती. याच दरम्यान त्याने तिला कुरिअरने पत्र पाठवायचे आहे असे सांगून तिच्या आईचा घरचा पत्ता घेतला होता.

मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता तिची आई घरकामासाठी तर तिचा भाऊ कामासाठी घरातून निघून गेले होते. सकाळी अकरा वाजता ती घरासमोर असताना तिथे दिनेश आला. त्याने तिला त्याच्यासोबत येण्यास सांगितले, तिने नकार देताच त्याने त्याच्याकडील चाकूने तिला जिवे मारण्याची धमकी दिली होती. आता तुला सोडणार नाही अशी धमकी देऊन त्याने तिच्या गळ्यावर दोन वार केले होते. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी निकिताला तातडीने कांदिवलीतील शताब्दी हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथेच तिच्या जखमेवर एकूण सोळा टाके लागले होते.

ही माहिती मिळताच दहिसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. निकिताची जबानी नोंदवून तिच्या तक्रारीवरुन पोलिसांनी तिचा पती दिनेश जाधव याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत त्याला त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page