घरफोडीच्या घटनेत चोरट्यांकडून २५ लाखांच्या मुद्देमालावर हातसफाई

शिवाजी पार्क-वाकोला-ऍण्टॉप हिल पोलिसांकडून स्वतंत्र गुन्ह्यांची नोंद

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जुलै २०२६
मुंबई, – घरफोडीच्या तीन वेगवेगळ्या घटनेत अज्ञात चोरट्याने तीन फ्लॅटमध्ये प्रवेश करुन सुमारे पंचवीस लाखांच्या मुद्देमालावर हातसफाई केल्याची घटना सांताक्रुज, दादर आणि ऍण्टॉप हिल परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी वाकोला, शिवाजी पार्क आणि ऍण्टॉप हिल पोलिसांनी तीन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. घरफोडीच्या या तिन्ही घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

पहिली घटना सांताक्रुज येथील डवरी नगर गेट क्रमांक एक, दादामिया चाळीत घडली. या चाळीतील रुम क्रमांक सी/२७/एस/१०४ मध्ये भावेश प्रितम करंगुटकर हे एकटेच राहतात. त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले असून एक भाऊ सांताक्रुज येथे राहतो. ते स्वत एका खाजगी विदेशी कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी ३० जूनला सायंकाळी पाच वाजता ते कामासाठी घरातून निघून गेले. रात्री उशिरा सव्वातीन वाजता ते घरी आले असता त्यांच्या घरी चोरी झाल्याचे दिसून आले. अज्ञात चोरट्याने रुममध्ये प्रवेश करुन कपाटातील १४ लाख २० हजार रुपयांचे विविध सोन्याचे दागिने आणि बारा हजाराची कॅश कॅश असा १४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. या घटनेनंतर त्यांनी वाकोला पोलिसांना चोरीची माहिती दिली होती.

दुसरी घटना दादरच्या एस. एस परुळकर मार्ग, सरोज इमारतीमध्ये घडली. याच इमारतीच्या तळमजल्यावरील रुम क्रमांक दोनमध्ये ६६ वर्षांच्या राजेश्‍वरी रवीकुमार गुडलवल्लेटी ही महिला राहत असून ती एअर इंडियामधून निवृत्त झाली आहे. २९ जूनला राजेश्‍वरी तिची वयोवृद्ध आई जिड्डू सरोजा लाजाराव हिच्योबत तिची बहिण रेखा शर्माच्या अंधेरीतील घरी राहण्यासाठी गेल्या होत्या. मंगळवारी २८ जूनला रात्री पावणेदहा वाजता तिच्या इमारतीमध्ये राहणार्‍या देशपांडे यांनी राजेश्‍वरीला कॉल करुन तिच्या फ्लॅटचे लॉक तुटले असल्याची माहिती दिली. मात्र रात्री उशिरा घरी जाणे शक्य नसल्याने ती दुसर्‍या दिवशी सकाळी तिच्या घरी आली होती. यावेळी तिला तिच्या घरी चोरी झाल्याचे तसेच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तिने कपाटाची पाहणी केल्यानंतर त्यात तिला विविध सोन्याचे, हिर्‍यांचे दागिने, चांदीचे प्लेट, समई, कलश असा सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे दिसून आले. स्थानिक रहिवाशांकडून ही माहिती प्राप्त होताच शिवाजी पार्क पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.

तिसरी घटना सोमवारी रात्री आठ ते रात्री अकरा वाजता ऍण्टॉप हिल येथील राजीव गांधी नगर, चाळ क्रमांक ८६ मध्ये घडली. यातील तक्रारदार ठाण्यातील शिळफाटा, एममएआरडीए कॉलनीत राहत असून ते एका खाजगी कंपनीत आयटी इंजिनिअर म्हणून कामाला आहे. ऍण्टॉप हिल येथे त्यांचे वयोवृद्ध एकटेच राहतात तर काही अंतरावर त्यांचा लहान भाऊ राहतो. तो अधूनमधून त्यांना भेटण्यासाठी जातो. २७ जूनला त्यांच्या वडिलांविरुद्ध ऍण्टॉप हिल पोलीस ठाण्यात अपहरणासह पोक्सोचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने त्यांच्या कपाटातील तिजोरीचे लॉक तोडून विविध सोन्याचे दागिने आणि कॅश असा अडीच लाखांचा मुद्देमाल चोरी करुन पलायन केले होते. हा प्रकार उघडकीस येताच त्यांनी ऍण्टॉप हिल पोलिसांनी चोरीची तक्रार केली होती. या तिन्ही घटनेनंतर वाकोला, शिवाजी पार्क आणि ऍण्टॉप हिल पोलिसांनी दोन स्वतंत्र घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. परिसरातील सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेऊन पोलिसांनी पळून गेलेल्या आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page