एमटीएनएलच्या कॉपर केबल चोरी करणार्या टोळीचा पर्दाफाश
एक कोटीच्या मुद्देमालासह चार आरोपींना अटक व कोठडी
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
१ जुलै २०२६
मुंबई, – महानगर टेलिफोन निगम लिमिटेडच्या कॉपर केबल चोरी करणार्या एका सराईत टोळीचा गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीशी संबंधित चार आरोपींना बोरिवली येथून पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. साहिल शकील साह, अब्दुल सिद्धीक अहमद शेख, रिझवान मेहताब मलिक आणि मोहम्मद अफजल हसन खान अशी या चौघांची नावे आहेत. यातील अब्दुल शेख आणि मोहम्मद अफजल खान हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध कांदिवली आणि नवघर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अटकेनतर या चौघांनाही किल्ला कोर्टाने शनिवार ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
गेल्या काही महिन्यांत एमटीएनएलच्या कॉपर केबल चोरीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली होती. रात्रीच्या वेळेस एमटीएनएलचे कर्मचारी असल्याची बतावणी करुन काही टोळ्यांकडून या कॉपर केबल चोरीचे प्रकार सुरु होते. याबाबत मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात संंबंधित आरोपीविरुद्ध सातहून गुन्हे दाखल झाले होते. त्यात चारकोप, समतानगर, आरे, कुरार, गोरेगाव आणि दिडोंशी पोलीस ठाण्यांचा समावेश होता. यातील काही आरोपींना पोलिसांनी अटक करुन त्यांच्याकडून चोरीचा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या कारवाईनंतर काही टोळ्यांकडून कॉपर केबल वायर चोरीचे गुन्हे घडत होते. त्यामुळे या टोळ्यांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश पोलीस आयुक्त देवेन भारती, सहपोलीस आयुक्त अनिल कुंभारे, अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सर्वच गुन्हे शाखेला दिले होते.
या आदेशानंतर पोलिसांनी संबंधित आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना बोरिवलीतील वसंत मारवल रोड, क्लिरिऑन इमारतीसमोरील मागाठाणे टेलिफोन एक्सचेंजवळ काहीजण एमटीएनएलच्या कॉपर केबल वायर चोरीसाठी येणार असल्याची माहिती युनिट दहाच्या अधिकार्यांना मिळाली होती. या माहितीनंतर सहाय्यक पोलीस आयुक्त सदानंद राणे, प्रभारी पोलीस निरीक्षक विशाल राजे यांच्यसह त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश तोडकर, पोलीस उपनिरीक संदेश इंगळे, पोलीस अंमलदार रामकिशन मोरे, धनंजय जाधव, चंद्रशेखर डफळे, अशोक परब, अनिकेत निकम, सुधाकर निर्मळे यांनी तिथे साध्या वेशात गस्त सुरु केली होती.
ही गस्त सुरु असतानाच पोलिसांनी चार संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. संबंधित आरोपी मागाठाणे टेलिफोन एक्सचेंजजवळ कॉपर केबल वायरची चोरी करण्यासाठी आले होते. त्यांच्याकडून पोलिसांनी ३९ लाख ४० हजार रुपयांचे दोन हजार पेअरचे ९८५ मीटर कॉपर केबल वायर, प्रत्येकी दहा लाखांचे दोन बोलेरो पिकअप वाहन, ४० लाखांची जेसीबी, मोबाईल असा १ कोटी पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिता आणि दूरसंचार अधिनियम कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर त्यांना किल्ला कोर्टात हजर करणयत आले होते. यावेळी चारही आरोपींना कोर्टाने शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील अब्दुल शेखविरुद्ध नवघर तर मोहम्मद अफजल खानविरुद्ध कांदिवली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.