घरकाम करताना आठ लाखांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई

४५ वर्षांच्या मोलकरणीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
६ जुलै २०२६
मुंबई, – घरकाम करताना सुमारे आठ लाखांच्या विविध सोन्याच्या दागिन्यांवर घरातील मोलकरणीने हातसफाई केल्याची घटना करी रोड परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी योगिता नावाच्या ४५ वर्षांच्या आरोपी मोलकरणीविरुद्ध ना. म जोशी मार्ग पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. योगिताने यापूर्वीही तक्रारदार महिलेच्या शेजारील घरी घरकाम करताना चोरी केली होती, चोरीचे सर्व दागिने नंतर तिने परत केले होते. या चोरीनंतर तक्रारदार महिलेच्या घरातील चोरीचा पर्दाफाश झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

विभावरी विलास खोत ही ६१ वर्षांच्या वयोवृद्ध महिला तिच्या पती विलास आणि मुलगा अद्वेत यांच्यासोबत करी रोड, महादेव पालव मार्गावरील श्री पिंपळेश्‍वर सोसायटीमध्ये राहते. ती महानगरपालिकेत कामाला होती, २०२२ साली ती निवृत्त झाली असून सध्या घरी असते. त्यांच्याकडे योगिता ही २०१२ पासून घरकाम करते. सकाळी साडेनऊ ते साडेअकरा असे तिच्या कामाची वेळ होती. अनेकदा विभावरी गावी गेल्यानंतरही ती घरी कामासाठी येत होती. त्यामुळे तिने तिला घराची एक चावी दिली होती. १५ मार्चला ती तिच्या पतीसोबत तिच्या सिंधुदुर्गच्या मालवण या गावी गेली होती.

२९ मेला तिने योगिताला कामावरुन टाकून टाकले होते. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी तिचा मुलगा अद्वेतने विभावरीला त्यांच्या शेजारी राहणार्‍या प्रतिक अरुण तावडे यांच्या घरी चोरी झाल्याची माहिती दिली होती. या चोरीनंतर त्यांनी तिला पोलीस ठाण्यात नेले होते. सुरुवातीला ती चोरी केली नसल्याचे सांगत होती. मात्र नंतर तिने घरकाम करताना चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिने चोरीचे सर्व दागिने प्रतिक तावडे यांच्या स्वाधीन केले होते. त्यानंतर तिने तिच्या कपाटातील दागिन्यांची पाहणी केली, त्यात तिला सुमारे आठ लाखांचे विविध सोन्याचे दागिने मिसिंग असल्याचे दिसून आले.

घरकाम करताना योगितानेच कपाटातील सोन्याच्या दागिन्यांवर हातसफाई केली होती. नोव्हेंबर २०२४ रोजी तिला पहिल्यांदा योगितावर संशय आला होता, मात्र दिवाळी असल्याने तिने त्याकडे दुर्लक्ष केले होते. मात्र कपाटातील सर्व दागिन्यांची पाहणी केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. नोव्हेंबर २०२४ ते मे २०२६ या कालावधीत योगिताने दागिने चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन तिने ना. म जोशी मार्ग पोलिसांत तिच्याविरुद्ध चोरीची तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर योगिताविरुद्ध पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून तिला अद्याप अटक झाली नाही. तिची लवकरच पोलिसांकडून चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page