एमडी ड्रग्ज विक्रीच्या दोन कारवाईत चारजणांच्या टोळीस अटक

आरोपींकडून सव्वासात लाखांचे एमडीसह कॅश हस्तगत

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२६
मुंबई, – शहरात दोन वेगवेगळ्या कारवाईत एमडी ड्रग्जसहीत चारजणांच्या एका टोळीला बांगुरनगर आणि मालाड पोलिसांनी अटक केली. कुणाल दिपक शाह, दिव्येश महेश ठक्कर, फरदीन परवेज शेख आणि अरमान अस्लम शेख अशी या चौघांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी ६९ ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज आणि ४० हजार रुपयांची कॅश असा सव्वासात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.अटकेनंतर चारही आरोपींना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

मुंबई शहरात एमडी ड्रग्ज तस्करीच्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली असून अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम सुरु असताना मंगळवारी २१ जुलैला बांगुरनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश कोंडूभैरी, पोलीस हवालदार संदीप संकपाळ, पोलीस शिपाई मच्छिंद्र खेडकर, रोहित आवळकर आदीचे एक पथक परिसरात गस्त घालत होते. रात्री साडेनऊ वाजता गोरेगाव येथील एम. जी रोड, गणेशघाट जाणार्‍या रस्त्यावर या पथकाला एका तरुणाची हालचाल संशयास्पद दिसून आली. त्यामुळे त्याला पळून जाण्याची कुठलीही संधी न देता पोलिसांनी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.

चौकशीत त्याचे नाव फरदीन शेख असल्याचे उघडकीस आले. तो गोरेगाव येथील शहीद भगतसिंगनगर परिसरात राहत असून डिलीव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याच्या अंगझडतीत पोलिसांना ६७ ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज सापडले. या ड्रग्जची किंमत पावणेसात लाख रुपये इतकी होती. तपासात त्याला ते ड्रग्ज अरमान शेख याने दिल्याचे सांगितले. त्यानंतर या पथकाने अरमान शेखला चौकशीसाठी ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध नंतर पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत अटक केल्यानंतर अरमान आणि फरदीनला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

अशाच दुसर्‍या कारवाई मालाड पोलिसांनी कुणाल शाह आणि दिव्येश ठक्कर या दोघांना अटक केली. मालाडच्या सुंदरनगर परिसरात फिरत असताना या दोघांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यांच्या अंगझडतीत पोलिसांना एमडी ड्रग्जसहीत ४० हजार रुपयांची कॅश सापडली. एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई केल्यानंतर या दोघांनाही बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page