लॉ कॉलेज तरुणावर प्राणघातक हल्ला करणार्या आरोपीस अटक
पोलिसांत तक्रार केल्याच्या रागातून हल्ला केल्याची कबुली
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२२ जुलै २०२६
मुंबई, – पोलिसांत तक्रार केली म्हणून २४ वर्षांच्या लॉ कॉलेजच्या तरुणावर प्राणघातक हल्ला करणार्या एका वॉण्टेड आरोपीस कुरार पोलिसांनी अटक केली. राहुल अमरनाथ विश्वकर्मा ऊर्फ आडी असे या आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांत शिवम सिंग आणि अन्य एक आरोपी सहआरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कंचन दिनानाथ तिवारी हा मालाडच्या कुरार व्हिलेज परिसरात राहत असून बोरिवलीतील एका लॉ कॉलेजमध्ये शिक्षण घेतो. त्याचे वडिल दिनानाथ तिवारी हे मेट्रो दिनांक समाचार या साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम करतात. वडिल पत्रकार असल्याने ते मालाड परिसरातील चुकीच्या गोष्टीसह गुंडगिरीविरोधात स्थानिक पोलिसांत तक्रार करतात. त्यामुळे संबंधित गुंडांकडून त्यांच्या कुटुुंबियांना त्रास दिला जात होता. त्यात शिवम सिंग आणि राहुल विश्वकर्मा या स्थानिक गुंडांचा समावेश होता.
९ जुलैला कंचन हा घरासमोर असलेल्या नळावर पाणी भरत होता. यावेळी तिथे डोक्यापासून चेहर्यापर्यंत प्लास्टिक पिशवी घेतलेले तीन तरुण आले. आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करतोस का, आज तुझा गेम वाजवतो अशी धमकी देऊन त्यांनी त्याच्याकडील रबरासारख्या लांब वायरने त्याच्या डोक्यावर, छातीवर, चेहर्यावर बेदम मारहाण केली. यावेळी त्याने आरडाओरड सुरु केल्याने स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तिथे लोक जमा होताच तिन्ही आरोपींनी त्यांना चाकूसह रबरासारख्या वायरने जिवे मारण्याची धमकी दिली होती. यावेळी कंचन व त्याचा भाऊ लवकुश यांनी तीनपैकी शिवम आणि राहुल यांना ओळखले. मात्र त्यांना पकडण्यापूर्वीच ते तिघेही घटनास्थळाहून पळून गेले होते.
हल्ल्यांत कंचन हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला कांदिवलीतील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर त्याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी राहुल, शिवम आणि अन्य एका अनोळख व्यक्तीविरुद्ध हत्येचा प्रयत्नासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच पळून गेलेल्या आरोपींचा पोलिसांनी शोध सुरु केला होता. ही शोधमोहीम सुरु असतानाच शनिवारी राहुल विश्वकर्मा याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील स्थानिक न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.