चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत दोन आरोपी महिलांना अटक
दोन्ही महिलांवर साडेसहा लाखांचे दागिने चोरी केल्याचा आरोप
मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जुलै २०२६
मुंबई, – चोरीच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत दोन आरोपी महिलांना समतानगर आणि बोरिवली पोलिसांनी अटक केली. आरती गौतम लहाणे आणि शायमा ऊर्फ शमा अब्दुल रौफ खान अशी या दोघांची नावे आहेत. अटकेनंतर या दोघींना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.
प्रकाश मोहन पोरजे हे पुण्यातील रहिवाशी आहे. जानेवारी २०२५ पासून ते बोरिवलीतील एल. टी मार्ग, मिनी झव्हेरी बाजारातील तनिष्क ज्वेलर्समध्ये स्टोअर ऑपरेशन मॅनेजर म्हणून काम करतात. दिवसभरातील सोन्याच्या दागिन्यांसह विक्री झालेल्या दागिन्यांचे रात्री उशिरा ऑडिट केले जाते. २१ एप्रिल २०२६ रोजी दागिन्यांची नेहमीप्रमाणे मोजणी करण्यात आली होती. त्यात एका कर्मचार्याला सुमारे सव्वापाच लाखांची एक हिरेजडीत सोन्याची बांगडी मिसिंग असल्याचे दिसून आले.
या घटनेनंतर कर्मचार्यांनी दोन ते तीन वेळा दागिन्यांची मोजणी केली, मात्र एक बांगडी मिसिंग होती. हा प्रकार उघडकीस येताच प्रकाश पोरजे यांनी बोरिवली पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंदवून तपास सुरु केला होता. ज्वेलर्स शॉपमधील सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरुन पोलिसांनी शायमा ऊर्फ शमा खान या महिलेस चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिनेच ती हिरेजडीत सोन्याची बांगडी चोरी केल्याची कबुली दिली. या कबुलीनंतर तिला पोलिसांनी अटक केली.
दुसर्या गुन्ह्यांत आरती लहाणे या महिलेस समतानगर पोलिसांनी अटक केली. ३५ वर्षांचे मलय संजय मोटे हे कांदिवलीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्स, लोढा व्हाईट सिटी अपार्टमेंटमध्ये राहत असून बीकेसीतील सेल्स फोर्स कंपनीत इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांच्या घरी आरती लहाने ही गेल्या चार महिन्यांपासून मोलकरणी म्हणून काम करत होती. २६ जूनला सकाळी आठ वाजता आरती ही नेहमीप्रमाणे कामावर आली आणि दैनदिन काम करुन सकाळी साडेनऊ वाजता निघून गेली होती. आंघोळीला जाण्यापूर्वी त्यांच्या आईने तिचे सव्वालाखांचे सोन्याचा एक नेकलेस आणि कानातील दोन कर्णफुले ड्राव्हरमध्ये ठेवली होती, नंतर तिला तिचे दागिने ड्राव्हरमध्ये सापडले नाही.
घरात आरतीशिवाय कोणीही आले नव्हते. त्यामुळे तिनेच ही चोरी केल्याचा संशय व्यक्त करुन त्यांनी तिच्याविरुद्ध समतानगर पोलिसांत तक्रार केली होती. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल होताच दोन दिवसांपूर्वी आरतीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीत तिने ही चोरी केल्याची कबुली दिली. अटकेनंतर या दोन्ही महिलांना बोरिवलीतील लोकल कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्याकडून चोरीचा सर्व मुद्देमाल लवकरच हस्तगत केला जाणार आहे.