पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पतीसह दिराला अटक

हुंड्यासाठी होणार्‍या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे उघड

0

मुंबई क्राईम टाइम्स डॉट कॉम
२३ जुलै २०२६
मुंबई, – पत्नीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी पतीसह दिराला मालवणी पोलिसांनी अटक केली. बाबू काशिनाथ वाळवे आणि मोतीराम ऊर्फ दादासाहेब काशिनाथ वाळवे अशी या दोघांची नावे असून ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्यांत प्रियांका मोतीराम वाळवे, सिंधु काशिनाथ वाळवे आणि मोतीराम काशिनाथ वाळवे या तिघांना पाहिजे आरोपी दाखविण्यात आले असून त्यांच्यावर लवकरच अटकेची कारवाई होणार आहे. या पाचजणांवर स्वाती बाबू वाळवे हिचा हुंड्यासाठी मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. स्वातीचा सहापानी सुसायट नोटवरुन हा प्रकार उघडकीस आलयचे पोलिसांनी सांगितले.

महेश मल्हारी गायकवाड हा तरुण मूळचा लातूरच्या धानोरा, बामणीचा रहिवाशी असून मजुरीचे काम करतो. स्वाती ही त्याची मोठी बहिण असून ११ जून २०१९ रोजी तिचे बाबूसोबत दोन्ही कुटुंबियांच्या संमतीने रितीरिवाजाप्रमाणे लग्न झाले होते. लग्नानंतर ती मालाडच्या मालवणी, शिवाजीनगर, वाळवे हाऊस या सासरी राहण्यासाठी गेली होती. लग्नानंतर तिला एक मुलगी झाली असून तिचे नाव शिवन्या आहे. बाबूला लग्नापूर्वीच दारु पिण्याचे तसेच जुगार खेळण्याचा नाद होता. ही बाब त्यांनी त्यांच्या कुटुंबियांसोबत लपवून ठेवली होती. लग्नाच्या एक वर्षांनंतर स्वातीला ही माहिती समजली होती.

२०२४ पासून बाबू हा मोठ्या प्रमाणात दारु प्यायला लागला तसेच दररोज जुगार खेळत होता. त्यासाठी त्याची नोकरी सोउून दिली होती. दारुवरुन होणार्‍या भांडणानंतर तो स्वातीचा मानसिक व शारीरिक शोषण करत होता. अनेकदा गावी आल्यानंतर तो स्वातीच्या घरच्या लोकांकडून पैसे घेत होता. बहिणीला त्रास होऊ नये म्हणून महेशने त्याला अनेकदा आर्थिक मदत केली होती. मे २०२६ रोजी स्वाती आणि बाबू त्यांच्या गावी आले होते. यावेळी त्याने स्वातीच्या कुटुंबियांकडे लग्नात हुंडा दिला नाही म्हणून पाच लाखांची मागणी केली होती. यावेळी त्यांनी कर्ज काढून त्याला पाच लाख रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. याच हुंड्यावरुन तो स्वातीला सतत शिवीगाळ करुन मारहाण करत होता.

याबाबत स्वातीने महेशला फोनवरुन माहिती सांगून पैशांची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्याचे सिव्हील स्कोर कमी असल्याने त्याला कुठल्याही बँकेतून कर्ज मिळत नव्हते. त्यामुळे त्यांनी घरावर कर्ज घेण्याचे ठरविले होते. याच दरम्यान मोतीरामने त्याला फोनवरुन बाबू हा कर्जबाजारी झाला असून त्याला तातडीने आर्थिक मदत करा असे सांगितले होते. हुंड्यावरुन होणार्‍या मानसिक व शारीरिक शोषणाला स्वाती कंटाळून गेली होती. तिला प्रचंड मानसिक नैराश्यात आले होते. याच नैराश्यातून २९ जून २०२६ रोजी सकाळी तिने तिच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

ही माहिती मिळताच गायकवाड कुटुंबिय मुंबईत आले होते. यावेळी त्यांना स्वातीने आत्महत्या करण्यापूर्वी सहापानी सुसायट नोट लिहिल्याचे समजले. त्यात तिने हुंड्यासाठी तिचा तिच्या सासरच्या मंडळीकडून मानसिक व शारीरिक शोषण सुरु होता. त्याला कंटाळून ती आत्महत्या करत असल्याचे नमूद केले होते. या सुसायट नोटविषयी समजताच वाळवे कुटंबियांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करु नये म्हणून त्याला धमकी दिली होती. पत्रात स्वातीने तिच्या आत्महत्येला तिचा पती बाबू वाळवे, दिर मोतीराम वाळवे, प्रियांका वाळे आणि मोतीराम वाळवे आणि सिंधु वाळवे असे पाचजण जबाबदार असल्याचा आरोप केला होता.

त्यामुळे महेश गायकवाड याने मालवणी पोलिसांत पाचही आरोपीविरुद्ध हुंड्यासाठी स्वातीचा मानसिक व शारीरिक शोषण करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करुन त्यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर एकाच कुटुंबातील पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत नंतर बाबू वाळवे आणि मोतीराम वाळवे अशा दोघांना पोलिसांनी अटक केली. पोलीस कोठडीनंतर या दोघांना नंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page